कामगार भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेने उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेत केली खाडाखोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 06:30 PM2020-06-24T18:30:04+5:302020-06-24T18:30:36+5:30
दोघा उमेदवारांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
पुणे : कामगार आयुक्त कार्यालयाने घेतलेल्या क्लार्क, शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेचे काम सोपविलेल्या संस्थेनेच उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन उमेदवारांच्या निकालात फेरफार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परीक्षा घेण्याचे काम दिलेल्या कंपनीच्या संचालकांच्या विरुद्ध कामगार आयुक्तालयाच्या वतीने खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा उमेदवारांनी केलेल्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रसाद बांदिवडेकर (संचालक, मे एक्झॉन आॅटोमेशन, दादर, मुंबई, सध्या एस बी सिस्टिम प्रा. लि. (विश्व कुटीर शंकर घाणेकर मार्ग, दादर), आनंद काळे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ हा प्रकार २२ जानेवारी ते १० मार्च २०१७ या कालावधीत घडला होता़
याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर (वय ३४, रा़ जुनी सांगवी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१५ मध्ये राबविण्यात आली होती. त्यात क्लार्क, शिपाई (वर्ग क व ड) ८ हजार९४ पदांची भरती होणार होती. या परिक्षेचे काम एक्झॉन कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान घेण्यात आलेल्या पती परीक्षेतील काम संबंधित कंपनीला देण्यात आले होते. कंपनीने आर्थिक प्रलोभनाला बळी पडून नियमांना बगल देऊन त्यांनी भरती प्रक्रियेतील क्रमांक १ व २ उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड केली. त्यांच्या निकालात फेरफार केला. त्यामुळे या दोन उमेदवारांना शासकीय सेवेपासून वंचित राहावे लागले. उमेदवारांचे आर्थिक नुकसान करुन उमेदवारांची व शासनाची फसवणुक केली.
महेंद्र देशमुख आणि सुधाकर इंगळे यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कामगार आयुक्तांनी या परीक्षेची चौकशी केली. त्यात त्यांच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड केल्यामुळे त्यांना शासकीय नोकरी मिळू शकली नसल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनी व संचालकांविरुद्ध तब्बल ३ वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. देवकर अधिक तपास करीत आहेत.