नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन!; शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंना ‘सेक्सटॉर्शन’ कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:21 AM2021-12-17T06:21:44+5:302021-12-17T06:22:16+5:30
याप्रकरणी सुर्वेंकडून शुक्रवारी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार.
मुंबई : ‘हॅलो, हाऊ आर यू, क्या हुवा जी’ म्हणत मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना अनोळखी व्यक्तीने सेक्सटॉर्शन कॉल करत ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांचा मॉर्फ अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
सुर्वे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांका (८२८०५३५४४२) वरून ‘हॅलो, हाऊ आर यू’ असा मेसेज आला होता. त्यानंतर पुन्हा १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी तीन वाजता हाय, असा मेसेज आला होता. अनोळखी मोबाईल क्रमांक असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर पुन्हा १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी सुर्वे यांचा व्हॉट्सॲप क्रमांक ९८२१०३४९२३ यावर आधीच्याच अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ‘हॅलो, क्या हुआ जी’ असा मेसेज आणि मागोमाग व्हिडिओ काॅल आला.
सुरुवातीला त्यांनी तो कॉल उचलला नाही. पण कॉलरने परत फोन केल्याने त्यांनी तो उचलला. तेव्हा समोर स्वतःचे कपडे काढून अश्लील चाळे करणारी महिला त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी कॉल कट केला, तरीही त्याच अनोळखी क्रमांकावरून पुन्हा व्हिडीओ कॉल येऊ लागले. तेव्हा ‘मला फोन करू नका, नाहीतर पोलिसात तक्रार करेन,’ असा मेसेज त्यांनी पाठवला. त्यावर सुर्वे यांचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओचा माॅर्फ करून तयार केलेला व्हिडीओ त्यांना पाठवत ५ हजारांची मागणी कॉलरने केली. पैसे पाठविले नाहीत, तर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकीही दिली. त्यानुसार सुर्वे यांनी दहीसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
धडा शिकविणे गरजेचे
मला त्यांनी जसा त्रास दिला तसा अनेकांना दिला असून, त्यांना धडा शिकविणे गरजेचे असल्याने मी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश सुर्वे, आमदार, मागाठाणे विधानसभा क्षेत्र