तो खून उसने पैसे परत देत नसल्याच्या रागातून; आरोपी ताब्यात
By राजन मगरुळकर | Published: January 21, 2024 04:16 PM2024-01-21T16:16:15+5:302024-01-21T16:17:15+5:30
पारवा शिवारातील घटनेत आरोपी ताब्यात : स्थागुशाची कामगिरी
परभणी : शहरातील पारवा शिवारात मंगळवारी मानवी सांगाडा आढळला होता. यामध्ये अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हा शाखा पथकाने रविवारी ताब्यात घेतले. सदरील आरोपीने मयताच्या वडिलांना पैसे दिले होते. हे पैसे परत देत नसल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या मूलाचा खून केल्याचे सांगितले.
परभणी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत पारवा शिवारात १६ जानेवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मानवी सांगाडा पोलिसांना आढळला. यामध्ये घातपात असल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना मयताची ओळख पटवून खुनातील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सदर सांगाड्यावरून मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना तत्काळ यश आले. मयत व्यक्ती हा हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख (२३, रा.आनंदनगर, पेडगाव) असल्याचे समजले. त्यानंतर सदरील प्रकरणात मयताचे वडिल शेख अकबर शेख नूर यांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासासाठी तीन वेगवेगळ्या पथकांची निर्मिती
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडून तीन वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. सदर आरोपी शेख उमर शेख रसूल (३८, रा.पेडगाव) हा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपीने मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. यातील मयतासोबत पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतले होते. परंतू, हे उसने घेतलेले पैसे आरोपीला परत देत नव्हते तसेच मयत अल्ताफ हा सदरचे पैसे त्याचे वडील अकबर बाबा यास देत नव्हता. याचा राग मनात धरून आरोपीने मयतास जीवे मारण्याची कबुली दिली. त्यास पुढील तपास कामी परभणी ग्रामीण ठाण्यात हजर करण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे करीत आहेत.
यांचा आरोपी शोधण्यात सहभाग
ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, कर्मचारी बालासाहेब तूपसुंदरे, दिलावर खान, विलास सातपुते, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, गणेश कौटकर, रवीकुमार जाधव यांनी केली.