संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:36 AM2023-12-21T06:36:15+5:302023-12-21T06:36:21+5:30
मृतांमध्ये दोन मेव्हणे व सासऱ्याचा समावेश; सासू ओरडल्याने वाचली
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब (जि. यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय व त्यातून झालेल्या वादातून जावयाने पत्नीसह सासरा आणि दोन मेव्हण्यांची पहारीने हल्ला करून हत्या केली, या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली. तिरझडा (ता. कळंब) येथे मंगळवारी रात्री घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. आरोपी गाेविंद पवारला (४०, रा. कळंब माथा, ह.मु. तिरझडा) न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठाेठावली आहे.
पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले (५०), मेव्हणा ज्ञानेश्वर ऊर्फ नाना घोसले (३२), मेव्हणा सुनील घोसले (२८), अशी मृतांची नावे आहेत. सासू रुखमा पंडित घोसले (४७) ही गंभीर जखमी आहे.
एकेकावर पहारीचे प्रहार
रात्री गोविंद पत्नीला घेऊन लहान मेव्हण्याचा डबा पोहोचविण्यासाठी शेतात गेला. तेथे त्याने पत्नी व मेव्हण्यावर पहारीने घाव घालून त्यांची हत्या केली. नंतर तो घरी परतला. त्यावेळी मोठा मेव्हणा, सासरे व सासू हे सर्व झोपलेले होते. गोविंदने मेव्हणा ज्ञानेश्वरवर पहारीने प्रहार करून त्याला संपविले. नंतर तो बाजूच्या घरात झोपलेल्या सासू व सासऱ्यांकडे गेला. त्यांच्यावरही त्याने हल्ला चढविला. जखमी सासूने आरडाओरडा केल्यामुळे ती वाचली. यात शेजारी जागे झाल्याने, गोविंद तीन मुलांना दुचाकीवर बसवून पसार झाला. आरोपी कळंब येथेच असल्याचे समजल्यानंतर रात्रीच त्याला अटक करण्यात आली.
तो का सुडाने पेटला?
आरोपी तीन महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडीत राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करीत होता. यावरून झालेल्या वादातून सासऱ्याने व मेव्हण्यांनी जावयाला मारहाण केली होती. तेव्हापासून तो सुडाने पेटला होता. .