संतापजनक...! शाळेत मुलींची अंतर्वस्त्र काढली, पॅड हटवले अन्...; HC च्या आदेशानंतर शिक्षिकेविरोधात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 01:33 PM2024-08-16T13:33:49+5:302024-08-16T13:34:29+5:30
जिल्हा प्रसाशनाच्या तपास पथकाने बुधवारी शाळेतील शिक्षकांचे जबाब नोंदवले. यानंतर, जया पवार नावाच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम 76, 79 आणि 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मल्हारगंज मधील एका सरकारी शाळेत मुलींचे अंडरविअर आणि पॅड हटवून फोनची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी आता संबंधित शिक्षकाविरोधातपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च न्यायालयाने प्रशासनाला कारवाईसाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा प्रसाशनाच्या तपास पथकाने बुधवारी शाळेतील शिक्षकांचे जबाब नोंदवले. यानंतर, जया पवार नावाच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम 76, 79 आणि 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, मुलींच्या पालकांनी आरोपी शिक्षकेला निलंबित करण्याची मागणीही केली आहे.
काही दिवसांपूर्वी, दहावीच्या वर्गात फोन वाजल्यामुळे मुलींची बाथरूममध्ये नेऊन तपासणी करण्यात आली. त्यांना कपडे काढायला सांगितले. विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपानुसार, शिक्षिकेने त्यांना अंडरविअर देखील काढायला सांगितले होते. एका मुलीने पोलिसांसमोर म्हटले आहे की, 'मॅडम काहीही ऐकायला तयार नव्हत्या. मी मॅडमला म्हणाले, माझ्या आईला फोन करून बोलावून घ्या. मला रडायला येत होते. मी अनेक वेळा म्हणाले, माझे कपडे काढू शकत नाही. मात्र त्यांनी, तू तुझी सलवार काढली नाही तर मी काढेन, अशी धमी दिली आणि सलवार ओढली. यानंतर जया मॅडमने मला माझे अंडरगारमेंट देखील काढायला लावले. मी म्हणाले, मॅडम, मला पीरियड्स आहेत, यावर त्यांनी माझा पॅडही बाजूला करून बघितले." मुलींनी हा संपूर्ण प्रकार घरी सांगितल्यानंतर, शाळेत जबरदस्त गोंधळ उडाला होता.
शिक्षकांनी दिली होती राजीनाम्याची धमकी -
या घटनेनंतर 3 ऑगस्टला हिंदूत्ववादी संघटनांनी शाळेत जोरदार निदर्शन केले होते. तेव्हा, जया पवार यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली गेली तर, शाळेचा संपूर्ण स्टाफ सामूहिक राजीनामे देईल, असा इसाराही शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर दिला होता.