दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय; चोरांपासून सावध राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 09:37 PM2018-11-06T21:37:08+5:302018-11-06T21:37:43+5:30
बाहेरगावी जाताना घरफोड्या टाळण्यासाठी खबरदारी बाळगण्याचे पोलीसांचे आवाहन
मीरारोड - दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी पोलीसांनी घराच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. कारण सुट्टीचे दिवस असल्याने घर बंद असल्याचे हेरुन घरफोड्यांचे प्रकार टाळण्यासाठी नागरीकांची जागरुकता आवश्यक असल्याचे नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी म्हटले आहे.
दिवाळीमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने कुटुंबिय सुध्दा कामासाठी सुट्या घेऊन गावी वा बाहेरगावी पर्यटनासाठी जातात. दिवाळीच्या सुट्यांमुळे लहान - मोठे सर्व उत्साहित असले तरी ज्यांनी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाण्याचा बेत आखला असेल त्यांनी आपल्या घराच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
बाहेरगावी जाण्यापूर्वी आपले सर्व मौल्यवान दागिने, वस्तू , दस्तावेज आदी बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत. घरात जास्त रोख रक्कम ठेऊ नका. बाहेरगावी जात आहात याबाबत आपल्या विश्वासू शेजा-यास कल्पना द्यावी. मुख्य दरवाजा तसेच सर्व खिडक्या व दरवाजे याचे लोखंडी ग्रिल मजबूत व बंद आहेत का याची खात्री करा. शक्य असल्यास ओळखीतली विश्वासु व्यक्ती घरी ठेवावी. दुचाकी, सायकल ही कुंपणात किंवा लोखंडी ग्रीलच्या आत हँडल लॉक करुन ठेवावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही व सुरक्षा आलार्म यंत्रणा बसवा अशा सूचना भालसिंग यांनी केल्या आहेत. पोलिसांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुध्दा लोकांना आवाहन केले. तसेच त्यास सकारात्मक प्रतिसाद लोकांकडून मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कोणासही अनुचित प्रकार घडल्याचे दिसून आल्यास तातडीने नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असुन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरीकांनी सुध्दा या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे भालसिंग म्हणाले.