पान मसाला कंपनीची ४०० काेटींची ‘माया’; बेहिशेबी आर्थिक व्यवहार उघड, Income Tax नं मारले छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:59 AM2021-08-01T05:59:14+5:302021-08-01T05:59:33+5:30
प्राप्तीकर खात्याने दिल्ली, नाेयडा, गाझियाबाद, कानपूर आणि काेलकाता येथे समूहाच्या ३१ ठिकाणांवर गुरुवारी छापे मारले हाेते
नवी दिल्ली : प्राप्तीकर खात्याने उत्तर भारतातील एका पान मसाला उत्पादक समूहावर छापे मारले हाेते. त्यात ४०० काेटी रुपयांहून अधिकचे बेहिशेबी आर्थिक व्यवहार पकडले आहेत.
प्राप्तीकर खात्याने दिल्ली, नाेयडा, गाझियाबाद, कानपूर आणि काेलकाता येथे समूहाच्या ३१ ठिकाणांवर गुरुवारी छापे मारले हाेते. त्या वेळी जप्त केलेल्या कागदपत्रांमधून माेठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. रिअल इस्टेट आणि पान मसाल्याच्या बेहिशेबी विक्रीतून समूहाने प्रचंड पैसा गाेळा केला आहे. हा बेहिशेबी पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा व्यवसायात वळविण्यात येत हाेता. छाप्यांमध्ये ५२ लाखांची राेख रक्कम तसेच ७ किलाे साेनेही जप्त करण्यात आले हाेते.
११५ बनावट कंपन्यांची साखळी
‘सीबीडीटी’च्या माहितीनुसार, या कारवाईतून देशव्यापी बनावट कंपन्यांची साखळी उघड झाली आहे. केवळ तीन वर्षांमध्ये २२६ काेटी रुपयांची उलाढाल केली. अशा ११५ कंपन्या उघड झाल्या आहेत. बेहिशेबी पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा वळविणे, अशी या समूहाची कार्यपद्धती हाेती.