पुरावा नष्ट करण्यासाठी घराला दिला रंग; अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:30 PM2021-08-29T12:30:44+5:302021-08-29T12:31:02+5:30
महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा
पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यातील साक्षीत महत्त्वाच्या गोष्टी बाहेर पडत असून, अश्विनी यांची यांची हत्या झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने पुरावा नष्ट करण्यासाठी घराला रंग दिला होता. ही रंगरंगोटी करताना त्याने आपली कोणतीही परवानगी घेतली नव्हती, अशी साक्ष फ्लॅटचे मालक कुमार घरत यांनी न्यायालयात दिली आहे.
अभय याने तो राहात असेलल्या मुकुंद प्लाझा इमारतीतील ४०१ या फ्लॅटमध्ये अश्विनी यांची हत्या केल्यानंतर, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी या फ्लॅटचे रंगकाम करून घेतले होते. मात्र, अभय या फ्लॅटमध्ये राहतच नव्हता, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न अभय याच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला. मात्र, घरत यांनी या फ्लॅटमध्ये अभय राहात होता, असे सांगितले. आपण कुरुंदकर याला फ्लॅटचे भाडेकरार करून घेण्याबाबत सांगितले होते. मात्र, त्याने नंतर करू, असे सांगून भाडे करारनामा करण्यास टाळले होते.