पाकचे धाबे दणाणले!; मुन्ना झिंगाडाला भारतात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:58 PM2018-08-08T17:58:05+5:302018-08-08T17:58:52+5:30
झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने त्याला भारताकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
बँकॉक - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना मुज्जकीर मुद्देसर ऊर्फ मुन्ना झिंगाडाचा ताबा घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक थायलंडला गेले होते. मात्र, त्यावेळी देखील पुराव्याअभावी भारताच्या पदरी अपयश पडले. मात्र, आता मुन्ना झिंगाडा भारताच्या हाती लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने त्याला भारताकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
झिंगाडा याला थायलंडमध्ये छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी थायलंड पोलिसांनी अटक केली होती. झिंगाडाला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारतीय तपास यंत्रणांनी केली होती. मात्र, पाकिस्तानने झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगत त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. जानेवारी महिन्यात भारतीय पोलिसांचे एक पथक थायलंडला गेले होते. त्या पथकाने झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर केले होते. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले असून त्याला भारताकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी यूएईत अटक झालेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलचा साथीदार फारुख देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले असून देवडीवालाची चौकशी करता यावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला पाकच्या तपास यंत्रणांच्या ताब्यात दिल्याने भारतासाठी तो मोठा धक्का होता.
A criminal court in Thailand has ruled that close associate of Chhota Shakeel, Sayyed Muzakkir Muddassar Hussain alias Munna Jhingra(in pic) is an Indian citizen and ordered his repatriation back to India. pic.twitter.com/MWdAUUTRLV
— ANI (@ANI) August 8, 2018