३ दिवसांत दुसऱ्यांदा पाकिस्तान हादरला: कराचीत मशिदीजवळ आयईडी स्फोटात महिलेचा मृत्यू, ११जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:21 PM2022-05-17T14:21:45+5:302022-05-17T14:26:52+5:30
Blast in Pakistan : स्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरण्यात आल्याचे कराची पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी पुन्हा एकदा कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. येथील खारदर भागातील न्यू मेमन मशिदीजवळ झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत.
स्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरण्यात आल्याचे कराची पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात पोलीस पिकअप आणि इतर काही वाहनांचे नुकसान झाले. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पंतप्रधान म्हणाले- कठोर कारवाई केली जाईल
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांना तात्काळ पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. सिंध सरकारला मदत करण्याबाबतही ते बोलले आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सर्व जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सिंधचे आयजीपी मुश्ताक अहमद महार यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
या भागात गुरुवारी स्फोट झाला
कराची शहरात तीनमधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी गुरुवारी कराचीच्या या भागात झालेल्या स्फोटात १ नागरिक ठार झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते. ही घटना घडवून आणण्यासाठी दुचाकीमध्ये आयईडी बसवून त्याचा स्फोट करण्यात आला.
१८ दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला होता
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अवघ्या १८ दिवसांपूर्वी कराची विद्यापीठावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारजवळ हा हल्ला झाला. मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी तीन महिला प्राध्यापक चीनमधील आहेत. चौथा पाकिस्तानी ड्रायव्हर आणि पाचवा गार्ड होता.