पोलिओ पाजण्यास पत्नीचं नकार देणं पाकिस्तानी अभिनेत्याला भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:47 PM2019-02-21T18:47:15+5:302019-02-21T18:49:35+5:30
फवाद खानविरोधात लाहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाकिस्तान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानविरोधात लाहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फवादच्या पत्नीने मुलीला पोलिओ ड्रॉप पाजण्यास नकार दिल्याने पोलिओ देणाऱ्या पथकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिओ पथकाच्या लेखी तक्रारीनंतर फवादविरोधात लाहोर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिओ डोस पाजणारं पथक फवादच्या घरी त्याच्या मुलीला डोस पाजण्यासाठी गेली. त्यावेळी फवादची पत्नी सदाफ फवाद खान घरी होती. मुलीला पोलिओ डोस पाजण्याचा विषय घरी गेलेल्या पथकाने काढल्यावर सदाफनं नकार दिला. फवादच्या पत्नीने पथकासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत पोलिओ डोस पाजणाऱ्या पथकाने फवादविरोधात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.दरम्यान, हा प्रकार घडताना फवाद मात्र पाकिस्तानात नव्हता. पाकिस्तान सुपर लीगसाठी तो दुबईत होता. मात्र, फवाद हा कुटुंब प्रमुख असल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.