पाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 09:28 PM2020-03-05T21:28:24+5:302020-03-05T21:37:42+5:30
न्यायालयाने आता त्यांना जामिनावर मुक्त केले आहे.
नवी मुंबई - नवी मुंबईतपाकिस्तानचा झेंडा जाळणाऱ्या शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना २०१७ ची आहे. नवी मुंबईत सध्या मनपा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तारखेला हजर राहत नव्हते म्हणून पोलिसांनी त्यांची म्हणून उचलबांगडी करत अटक केली. न्यायालयाने आता त्यांना जामिनावर मुक्त केले आहे.
२०१७ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी अबरनाथ यात्रेकरुंवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक भाविक ठार झाले होते. त्यावेळी पाकिस्तानविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती. नवी मुंबईतही शिवसेना पक्षाने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला होता.
त्यावेळी याप्रकरणी शहरप्रमुख विजय माने, समीर बागवान आणि गणपत शेलार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होत असताना तिघेही उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यावर गुरुवारी सकाळी वाशी पोलिसांनी तिघांनाही त्यांच्या घरातून अटक केली. दुपारी न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आले आणि त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.