गजवा-ए-हिंद कटात पाकिस्तानचा हात! एनआयएच्या छाप्यात अनेक पुरावे सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:35 PM2023-11-26T22:35:45+5:302023-11-26T22:36:00+5:30
एनआयएने रविवारी टाकलेल्या छाप्यात मोबाईल फोन, सिम आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.
भारतातील गजवा ए हिंद कटामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. रविवारी एनआयएने उत्तर प्रदेशच्या आझमगड, मध्य प्रदेशच्या देवास आणि गुजरातच्या सोमनाथ, केरळच्या कोझिकोडमध्ये छापे मारले. यामध्ये महत्वाचे पुरावे सापडले आहेत.
जुलै 2022 मध्ये फुलवारी शरीफ, पाटणा येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याच्या कटाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. यासोबतच अटक करण्यात आलेल्या मरघूब अहमद दानिशच्या मोबाईलवर गझवा-ए-हिंद नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुपही सक्रिय असल्याचे आढळून आले. एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा गृप प्रत्यक्षात एका पाकिस्तानीने तयार केला होता.
एनआयएने रविवारी टाकलेल्या छाप्यात मोबाईल फोन, सिम आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये भारतातील कट्टरपंथी इस्लामचा प्रचार आणि गझवा-ए-हिंदमागे पाकिस्तानी हस्तकांचा सहभाग असल्याचे महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. नव्या पुराव्यांच्या आधारे फुलवारी शरीफमध्ये दाखल झालेल्या गझवा-ए-हिंद प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. आतापर्यंत यामागे केवळ पीएफआयचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतू, आता पाकिस्तान यामागे असल्याचे समोर आले आहे.
भारतात दानिशने अनेक तरुणांना त्यात सहभागी करून घेतले होते. व्हॉट्सअॅपशिवाय गझवा-ए-हिंद नावाचा हा ग्रुप टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरवरही सक्रिय होता. दहशतवादी हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात स्लीपर सेल तयार करणे हा यामागचा उद्देश होता.