खळबळजनक! 'त्याच्या' हत्येप्रकरणी 'ती' जेलमध्ये गेली अन् 6 वर्षांनी पतीला जिवंत पाहून हादरली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:38 PM2022-11-08T16:38:42+5:302022-11-08T16:39:44+5:30

राममिलन चौधरीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी सरिता देवी, सासू कलावती देवी, सासरे राधा चौधरी, भाऊ आणि काका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

palamu Crime news in jharkhand wife jailed for husband murder arrested after six years | खळबळजनक! 'त्याच्या' हत्येप्रकरणी 'ती' जेलमध्ये गेली अन् 6 वर्षांनी पतीला जिवंत पाहून हादरली

फोटो - TV9 hindi

googlenewsNext

झारखंडमधील पलामूमध्ये पोलिसांनी एक खळबळजनक घटना उघडकीस आणली आहे. या घटनेत पोलिसांना सहा वर्षांपूर्वी हत्या झालेल्या व्यक्तीचा शोध लावला आहे. याप्रकरणी या व्यक्तीच्या पत्नीसह सासू, सासरे या तिघांनाही अटक करण्यात आली होती. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. कौटुंबिक वैमनस्यातून आरोपीने पत्नी आणि सासू-सासऱ्यांना फसवण्याचा कट रचला होता. सातबरवा पोलिसांनी पलामूच्या छतरपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पलामू जिल्ह्यातील छतरपूरच्या नवा बाजार गावातील आहे. नवा बाजार येथील रहिवासी असलेल्या राममिलन चौधरी उर्फ चुनियाचं लग्न 2009 मध्ये सातबरवा पोलीस स्टेशन हद्दीतील पोची गावात राहणाऱ्या सरिता कुमारीसोबत झालं होतं. 2016 मध्ये त्यांची पत्नी सरिता देवी यांनी राममिलन चौधरीविरुद्ध हुंड्यासाठी मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी राममिलन संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला आणि त्याचा भाऊ दिलीप चौधरी याने त्याच्या हत्येचा गुन्हा दाखल केला.

राममिलन चौधरीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी सरिता देवी, सासू कलावती देवी, सासरे राधा चौधरी, भाऊ आणि काका याशिवाय गावातील कुदरत अन्सारी, लालन मियाँ आणि दानिश अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आठही आरोपींना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले. मात्र, नंतर सहा जण कोर्टातून जामिनावर बाहेर आले. या प्रकरणी दानिश अन्सारी अजूनही तुरुंगात आहे. मुलीचे वडील राधा चौधरी हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि जामिनानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला.

हुंड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राममिलन चौधरी उर्फ चुनिया याने सासरच्या मंडळींना फसवण्याचा कट रचला होता. या कटात त्याच्या भावाचाही समावेश होता आणि तो स्वतः बेपत्ता झाला होता. मात्र आता राममिलन चौधरी जिवंत असल्याची माहिती सासरच्या मंडळींना मिळाली. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर छतरपूर पोलिसांच्या मदतीने सातबरवा पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी सापळा रचला आणि त्याला पकडले. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: palamu Crime news in jharkhand wife jailed for husband murder arrested after six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.