जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष, जव्हारमध्ये तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:52 AM2023-01-18T10:52:22+5:302023-01-18T10:54:37+5:30
पोलिसांनी उधळला डाव; एक जण फरार
पाेलिसांनी आराेपींना जेरबंद करत त्यांच्याकडून बनावट नाेटा, त्रिशूल व जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भामट्यांना जव्हार पोलिसांनी खंबाळा परिसरात बेड्या ठोकल्या. जादूटोण्याद्वारे पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याचे आमिष दाखविण्याचा हा प्रकार पोलिसांनी वेळीच उधळल्याने लाखोंची फसवणूक टळली आहे.
सिद्धी प्राप्त असल्याचे सांगून केतन कृष्ण पाटील (रा. वज्रेश्वरी), श्रीनाथ लक्ष्मण भोये (साखरे विक्रमगड), माणिक अर्जुन बात्रा (आलोंडे, विक्रमगड) व इतर एक अशा चारजणांनी वलसाड उपलपाडा येथील कमलेश मंगळीया जोगारी (३९) यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन जादूटोणा करून पाच लाख रुपये करून देतो, असे आमिष दिले.
जव्हार पोलिसांना याची माहिती लागली. त्यांनी १२ जानेवारीला रात्री २ वाजेच्या सुमारास खंबाळा परिसरात सापळा रचला. एक इनोव्हा कार व एक मोटारसायकल थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटा, त्रिशूल व जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना मिळाले. जादूटोणा करणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी तिघांना जागेवरच बेड्या ठोकल्या; मात्र चौथा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.
कमलेश जोगारी यांच्या फिर्यादीवरून जव्हार पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी संजीव पिंपळे यांच्या सूचनेप्रमाणे जव्हार पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव यांचे पथक तसेच जव्हार व मोखाडा पोलिसांनी ही कारवाई केली.
खोट्या नोटांची बंडले
पैशांचा पाऊस पाडणाऱ्या तिघा ठगांकडून दोन हजार रुपयांच्या २७ खोट्या नोटांचे बंडल, पाचशे रुपयांच्या ७५ खोट्या नोटांचे बंडल, नोटांच्या आकाराचे कोरे कागदी बंडल, काचेचे तुकडे, विविध प्रकारचे पूजेचे सामान, त्रिशूळ व दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे तपास करीत आहेत.