पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप ह्यांना 25हजाराची लाच स्विकारताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 10:25 PM2022-04-25T22:25:09+5:302022-04-25T22:25:47+5:30
Bribe Case : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला तीन वर्षांपूर्वी कार्यालयाच्या बाहेर लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.
पालघर - पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षणाधिकारी लता सानप ह्यांना एका शिक्षिके कडून आपल्या घरात 25 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. जिल्हा निर्मिती पासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पैश्याच्या मागणी साठी अत्यंत बदनाम विभाग म्हणून ओळखला जात होता.तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला तीन वर्षांपूर्वी कार्यालयाच्या बाहेर लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.
त्यानंतरही ह्या विभागातील कामकाजात कुठलाही सकारात्मक बदल झालेला नव्हता. पालघरमध्ये शिक्षणाधिकारी पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर लता सानप ह्यांच्या उर्मट वागण्याचा अनुभव अनेकांना आला होता. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य ह्यांचा मानसन्मान त्या ठेवत नसल्याचे आणि उद्धट वागत असल्याच्या तक्रारी करून त्याची बदली करावी असा ठराव जिल्हापरिषदेच्या सभेत घेण्यात आला होता. नुकत्याच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत समितीने त्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत कडक ताशेरे ओढले होते.तरीही त्यांच्या वागण्यात कुठलाही बदल होत न्हवता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी सोमवारी शिक्षणाधिकारी लता सानप ह्यांनी शिक्षिकेकडे 25हजाराची लाच मागितली होती.
ह्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लता सानप ह्याच्या घरात 25 हजाराची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर झडप घालीत त्यानं ताब्यात घेतल्याचे उपअधीक्षक नवनाथ जगताप ह्यांनी लोकमत ला सांगितले. शिक्षणाधिकारी सानप ह्या अत्यंत उर्मट असुन जिल्हा परिषदेच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याचा आरोप होत.त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बैठकीत त्याच्या विरोधात बदली करावी असा ठराव ही घेण्यात आला होता.सध्या जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अत्यंत वादग्रस्त विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला होता.