Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:41 PM2020-05-07T22:41:15+5:302020-05-07T22:43:39+5:30
Palghar Mob Lynching : याआधी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. नंतर ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.
पालघर - डहाणू तालुक्यातील मॉब लिचिंग प्रकरणी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षकांचे स्लॅक सुपर व्हिजन झाल्याची बाब गृहमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ह्या प्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती मिळत आहे. याआधी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. नंतर ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.
पालघल जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटले होते. त्या दिवशी जमावासमोर त्या साधूंनी हात जोडून आपणास मारू नका, अशी विनवणी केली, मात्र संतप्त जमावाने त्यांचे काही ऐकले नाही. उलट पोलिसांसमोरच त्यांना ठार केले. त्यामुळे, राज्याच्या गृह विभागाने याची तात्काळ दखल घेत, याप्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन केले होते. त्यानंतर, येथील पोलीस ठाण्याशी संबंधित ३५ पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. तसेच, याप्रकरणी राज्य सरकारने १०० पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेतले असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले होते. धक्कादायक म्हणजे अटक आरोपींपैकी काही आरोपींना कोरोनाने देखील ग्रासले होते.
Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली
palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई