शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:13 IST2025-01-29T11:12:21+5:302025-01-29T11:13:10+5:30
प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले.

शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार
पालघर - गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाचं गौडबंगाल कायम आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि अन्य चौघांना ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी पोलिसांकडे आलेला संशयित आरोपी अविनाश धोडी अंधाराचा फायदा पोलीस ठाण्यातूनच घेत पसार झाला आहे. घोलवड पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात संशयित अविनाश धोडीला चौकशीसाठी बोलावलं होते. मात्र तो फरार झाला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे हॉटेल व्यावसायिकही आहेत. २० जानेवारीपासून अशोक धोडी बेपत्ता आहेत. याबाबत अशोक धोडी यांच्या पत्नीने घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी दीरावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र गुजरात सीमेवर हॉटेल व्यावसायिक असलेले अशोक धोडी १९ जानेवारीला सायंकाळी पत्नीला मुंबईला जातो म्हणून सांगत घरातून बाहेर पडले. २० जानेवारीला सायंकाळी ६ च्या सुमारास पत्नीला मोबाईलद्वारे फोन करून घरी येतोय असं कळवले परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरीच परतले नाहीत. त्यांची कार काटीलपाडा रस्त्यावरून भरधाव वेगाने गेल्याचं एका मित्राने सांगितल्याचं अशोक धोडी यांच्या मुलाने म्हटलं. तर अशोक धोडींना मीरारोड स्थानकावर सोडल्याचे बहिणीने माहिती दिली.
या प्रकरणी अशोक धोडी यांच्या पत्नीने दीर अविनाश धोडी आणि काही लोकांवर संशय व्यक्त केला. घोलवड पोलिसांनी अविनाश आणि त्याच्या २ मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून इतके दिवस झाले तरी अशोक धोडी आणि त्यांच्या कारचाही पत्ता लागला नसल्याने त्यांच्यासोबत घातपात झालाय का अशी भीती कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.