पॅनकार्ड हाती लागलं; आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:10 PM2018-07-30T17:10:44+5:302018-07-30T17:11:58+5:30
सावध राहा! जर तुम्ही मेट्रोमोनियल साईट्सवर जोडीदार शोधताय
मुंबई - आपल्याला मनासारखा, आपल्या विचारांना मिळताजुळता जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक तरुण-तरुणीची इच्छा असते. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण मेट्रोमोनियल साईट्सचा पर्याय निवडतात. पण हा पर्याय निवडताना नक्की सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. ‘shaadi.com’ या संकेतस्थळावरून घटस्फोटित आणि विधवा महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या एका भामट्याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश गायकवाड उर्फ शौर्य सावंत (वय - ३७) असं या भामट्याचं नाव आहे.
विक्रोळीच्या भारतनगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय पीडित तरुणीचा स्वतःचा व्यवसाय आहे. २०१० मध्ये या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, पतीसोबत झालेल्या मतभेदांमुळे २०१३ मध्ये अखेर तरुणीने पतीसोबत काडीमोड घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये तरुणीने आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी 'shaadi.com'वर आपलं प्रोफाइल बनवलं. त्यावेळी सप्टेंबर २०१७ मध्ये शैलेश गायकवाड यानं नाव बदलून शैलेश गायकवाड या नावानं तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. पुढे दोघांनीही मोबाईल नंबर देऊन एकमेकांशी संपर्क साधून भेटीगाठी वाढवल्या. तरुणीला आपण योग्य जोडीदार मिळवला असल्याची खात्री झाल्यानं दोघांनी पुढे लग्नाच्या अनुषंगाने बोलणी सुरू केली. ऑक्टोबर महिन्यात ठरल्यानुसार साखरपुडाही झाला. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, फेब्रुवारी महिन्यात तरुणीच्या हाती शैलेशचं पॅनकार्ड लागलं. त्यावर शैलेशचं नाव शौर्य सावंत असल्याचं पाहिल्यानंतर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर तरुणीने अनेकदा शैलेशला फोनवर संशयास्पद रित्या पाहिलं. एकदा शैलेश फोनवर बोलत असतानाच तरुणीने त्याचा फोन हिसकावून घेत कानाला लावल्यानंतर समोरून एक तरुणी बोलत होती. याबाबत विचारणा केली असता शैलेशने मैत्रिणीसोबत बोलत असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याच नंबरवर पीडित तरुणीने फोन लावून चौकशी केल्यानंतर शैलेशची चोरी पकडली गेली. शैलेश तरुणीच्या पश्च्यात मृदला पाठारे या महिलेशी बोलत होता. हे दोघे ही लवकरच साखरपुढा उरकून लग्न करणार होते. मागील दीड वर्षापासून शैलेशचं तिच्यासोबत प्रेमसंबध असल्याचं मृदलाने तरुणीला सांगितलं.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने शैलेश उर्फ शौर्यला चांगलंच धारेवर धरलं. त्यावेळी शौर्यकडे विचारणा केली असता. त्याने आपलं पहिलं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं असून पहिल्या पत्नीपासून पाच वर्षांचा मुलगा असल्याची कबुली दिली. तसंच त्याने तरुणीच्या कार्यालयातील २ लाख रुपये चोरल्याचीही कबूली दिली. या प्रकरणी तरुणीने विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवलेली. मात्र अशाच एका तरुणीच्या फसवणुकीप्रकरणी बदलापूर पोलिसांनीही शौर्यला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. शौर्य हा दहिसर परिसरात रहात असून त्याच परिसरातून त्याने shaadi.comवर विविध नावाने ७ प्रोफाइल बनवल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आहे. विक्रोळी पोलिसांनी शौर्यला अटक केल्यानंतर त्याने फसवणूक केलेल्या तरुणींची माहिती पोलिसांना दिली असून दिवसेंदिवस तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.