‘टॉर्चर’चा पंधरवाडा; दागिने लुटले, महिलेचे सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न!
By प्रदीप भाकरे | Published: June 11, 2023 03:19 PM2023-06-11T15:19:30+5:302023-06-11T15:22:00+5:30
महिलेला बेदम मारहाण : नाशिकहून कसेबसे गाठले अमरावती, मुलांना मारण्याची धमकी
अमरावती: बचत गटाचे काम करणाऱ्या एका महिलेला बळजबरीने शहराबाहेर नेऊन तब्बल १५ दिवस तिचा अनन्वित छळ करण्यात आला. त्या काळात तिचे मंगळसूत्र व अंगठी जबरदस्तीने हिसकवण्यात आली. तिला शिवीगाळ करून बेदम मारहाण देखील करण्यात आली. सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान तो झोपला असताना तिने नाशिकहून पळ काढला. ती अमरावतीत पोहोचल्यानंतर ती छळमालिका थांबली. तिने तत्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.
२२ मे ते ६ जून या कालावधीत तो प्रसंग घडला. याप्रकरणी, पिडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी १० जून रोजी पहाटे २.५६ मिनिटांनी आरोपी सागर चंदूमल रोढा (३४, रामपुरी कॅम्प) याच्याविरूध्द जबरी चोरी, विनयभंग, मारहाण, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीने तिला अकोला, धुळे, उल्हासनगर, नालासोपारा, अहमदाबाद अशा ठिकाणी जबरदस्तीने ठेवले. अखेर तिने ५ जून रोजी आरोपी सागर हा झोपलेला असताना अहमदाबादमधून पळ काढला. ती नाशिकला पोहोचून ६ जून रोजी सकाळी नागपुरला पोहोचली. तर, ९ जून रोजी तिने नातेवाईकांसह फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. संपुर्ण प्रकरणाची वाच्यता केल्यास तुझ्या दोन्ही मुलांना जीवे मारेन, अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने तिच्याकडील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र व दोन ग्रॅमची अंगठी असा ६० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला.
सिमकार्ड तोडले, मोबाईलही घेतला
तक्रारकर्ती महिला बचतगटाचे काम करते. तिने आरोपीचा भाऊ संदीप रोढा याला दोन लाख रुपये दिले होते. त्याने २० हजार रुपये परत केले. दरम्यान, पैसे परत करण्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला. त्यावेळी आरोपी सागर रोढा याने महिलेला फोन करून धमकावले. २२ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास आरोपीने तिला फोन करून बोलावले. तथा ऑटोमध्ये बसवून त्याने तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड तोडून फेकून दिले. तथा तिचा मोबाईल देखील हिसकावला.