डोंबिवलीत खळबळ! घरात घुसून महिलेची तोंड दाबून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:04 IST2022-01-17T16:55:23+5:302022-01-17T17:04:34+5:30
Murder Case : विजया या घरात एकटयाच राहत होत्या. सकाळी घरकाम करणारी महिला आली असता विजया यांच्या दरवाजाला बाहेरून कडी होती.

डोंबिवलीत खळबळ! घरात घुसून महिलेची तोंड दाबून केली हत्या
डोंबिवली: येथील पुर्वेकडील टिळकचौक परिसरातील आनंद शिला सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर या 58 महिलेची घरात घुसून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कोणीतरी तोंड दाबल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अज्ञात मारेक-याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजया या घरात एकटयाच राहत होत्या. सकाळी घरकाम करणारी महिला आली असता विजया यांच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून महिला घरात गेली असता हा धककादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेने याची माहीती शेजाऱ्यांना दिली.
त्यांनी तत्काळ याबाबत टिळकनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. माहीती मिळताच पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायय्क पोलिस आयुक्त जयराम मोरे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तोंड दाबल्याने विजया यांचा मृत्यू गुदमरून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असलातरी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांचे म्हणणो आहे. विजया यांच्या संपर्कातील व्यक्तींची कसुन चौकशी सुरू असून विजया या गेल्या 30 वर्षापासून घटस्फोटीत असून त्यांना चार बहीणी आहेत. त्यांच्या वडीलोपार्जित जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने विजया या आनंद शिला या इमारतीत गेल्या तीन ते चार वर्षापासून भाडयाने रहात होत्या.
हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून मारेक-याचा देखील शोध लावणो पोलिसांपुढे आव्हान पुढे ठाकले आहे. दरम्यान तपासाची दिशा मिळण्यासाठी आनंद शिला इमारतीच्या आजुबाजुला दुकानांमध्ये तसेच इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. शहरातील गजबजलेला भाग म्हणून परिचित असलेल्या टिळकचौकात असलेल्या बिल्डींगमध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.