मुंबईत खळबळ! विद्यार्थ्यांसह गायब झालेली स्कूल बस पोलिसांना सापडली, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:36 PM2022-04-04T18:36:19+5:302022-04-04T21:21:07+5:30
Poddar International School Bus was Missing : अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत/पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबई - शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली होती. सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, मात्र विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली नव्हती. त्यामुळे चिंतातुर पालकांनी तात्काळ शाळेकडे धाव घेतली आणि विचारणा केली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाईल बंद येत असल्याने पालक अधिकच धास्तावले होते. अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत बस गेली. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नव्हती. शाळा सुटून जवळपास 4 तास बसचा पत्ता लागला नव्हता. ही बस नेमकी कुठे होती? याचाही तपास पोलीस करत आहे. शाळेत गेलेली आपली लहान मुलं अजून घरी न परतल्याने विद्यार्थ्यांचे पालक काळजीत होते. पालकांकडून शाळा प्रशासन, स्कूल बसचालकाला फोन लावण्याचा प्रयत्न केले गेले. हे विद्यार्थी सकाळी 6 वाजता शाळेत गेले होते. मात्र अजूनही घरी न परतल्याने पालकांची चिंता वाढली होती.
शाळेला गेलेली मुलं अजूनही घरी परत न आल्याने पालकांनी आपल्या पाल्याचा शोध घेण्यासाठी जिकडेतिकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पालकांनी स्कूलबसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही मुलं नेमकी कोणत्या वयोगटातील आहेत, बसमध्ये मुला-मुलींची संख्या किती, याबाबतची कोणतीही सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही.