बेपत्ता डॉक्टर हातात इंजेक्शन आडकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:39 PM2022-07-10T21:39:40+5:302022-07-10T21:40:26+5:30
Doctor Suicide : कोल्हापूर जिल्हा मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे यांच्या त्या कन्या होती.
कोल्हापूर : ताराबाई पार्कमधील डॉ. अपूर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (वय ३०) या तरुणीने हातात इंजेक्शनद्वारे द्रव्य टोचून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे शाहुपूरी पोलिसांनी सांगितले. त्या रात्रीपासून बेपत्ता होत्या, रविवारी पहाटेच्या सुमारास घरानजीक डी मार्ट परिसरात त्यांचा मृतदेह रस्त्याकडेला फूटपाथवर आढळला. कोल्हापूर जिल्हा मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे यांच्या त्या कन्या होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. अपूर्वा हेंद्रे ह्या सर्जन होत्या, त्या खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होत्या. शनिवारी सायंकाळी त्या काही कार्यक्रमासाठी बाहेर होत्या, मध्यरात्री घरी परतल्या. काही मिनीटेच घरी थांबून पुन्हा मुख्य दरवाजाला बाहेरुन कडी लावून त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या आई - वडीलांना शंका आल्याने त्यांनी पुढील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो न उघडल्याने ते पाठीमागील दरवाजातून बाहेर येऊन त्यांनी अपूर्वाची शोधाशोध केली. तोपर्यत अपूर्वा ह्या गायब झाल्या होत्या. परिसरात शोधाशोधनंतर पहाटेच्या सुमारास डॉ. हेंद्रे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते, तोपर्यत ताराबाई पार्कमधील डी मार्ट समोरील रिक्षा स्टॉपशेजारी फुटपाथवर तरुणीचा मृतदेह आढळल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तिकडे धाव घेतली. डॉ. प्रविण हेंद्रे यांनी तातडीने मुलीला सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हातात इंजेक्शन आडकले
घटनास्थळी रिक्षा स्टॉपवरील कठड्यावर बसून त्यांनी इंजेक्शन घेतले असावे, त्यानंतर त्यांचा खाली पडून मृत्यू झाला. घटनास्थळी मृतदेहाच्या हातात इंजेक्शन आडकलेल्या अवस्थेत होते असे डॉ. प्रविण हेंद्रे यांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पर्समध्ये दोन इंजेक्शन व एक औषधांची बाटली मिळाली. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
दोन दिवस अस्वस्थ
गेले दोन दिवस डॉ. अपूर्वा अस्वस्थ होत्या, त्याबाबत त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या घरी तिच्या अस्वस्थेबाबत कल्पना दिली होती असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे.