खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:05 PM2022-03-22T17:05:20+5:302022-03-22T17:05:44+5:30
Laywer Stabbed : आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अप्पर पोलीस अधीक्षकांसह कर्मचारी दाखल
वर्धा : जीवे मारण्याच्या प्रयत्नात गुन्हा दाखल असलेल्या ८२ वर्षीय वृ़द्धाने न्यायालय परिसरात चक्क साक्षिदार असलेल्या महिला वकिलावरच चाकूहल्ला केला. ही घटना मंगळवारी २२ रोजी वर्धा न्यायालय परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने न्यायालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी कर्मचाऱ्यांसह न्यायालयात दाखल झाले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.योगिता रमेश मुन (४३) रा. पुलगाव असे जखमी महिला वकिलाचे नाव असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी भीम गोविंद पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी भीम गोविंद पाटील याने २०१६ मध्ये महिला वकिल योगिता मून यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची तारीख मंगळवारी वर्धा येथील सेशन न्यायालयात असल्याने आरोपी भीम पाटील आणि साक्षिदार महिला वकिल योगिता मुन हे दोघेही न्यायालय परिसरात हजर होते. दरम्यान भीम पाटील याने योगिता मुन यांच्या पाठीमागून चाकूने हल्ला चढविला. दरम्यान त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. तत्काळ जखमी महिला वकिलाला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांनी दिली.
................
आरोपी होता महिला वकिलाचा पक्षकार
महिला वकिल योगिता मुन यांनी आरोपी भीम गोविंद पाटील यांच्यातर्फे दोन दिवाणी दावे पुलगाव येथील न्यायालयात दाखल केले होते. आरोपी हा त्यांचा पक्षकार होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्याने भीम पाटील याने योगिता मुन यांना २०१६ मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याची तारीख वर्धा न्यायालयात मंगळवारी होती हे विशेष.