महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ; पतीने हत्या करून पुरले होते पत्नीला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:45 PM2021-12-09T21:45:06+5:302021-12-09T21:45:43+5:30
Murder Case : मृत महिलेचे नाव शुगिया (२८) असं आहे. बबलू असं या महिलेच्या पतीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या माहेरचे लोक सतत तिचा शोध घेत पोलीस ठाण्याच्या येरझाऱ्या मारत होते.
उत्तर प्रदेश - सोनभद्र परिसरात एका महिलेचा सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हा सांगाडा सोनभद्र शहरातील अनपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सापडला आहे. मृत महिलेचे नाव शुगिया (२८) असं आहे. बबलू असं या महिलेच्या पतीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या माहेरचे लोक सतत तिचा शोध घेत पोलीस ठाण्याच्या येरझाऱ्या मारत होते. मात्र, ती महिला बेपत्ता झाली नसून पतीनेच पत्नीची हत्या करून जंगलात मृतदेह पुरला होता. याप्रकरणी पोलिसांनी सासू आणि सासरे यांना बुधवारी अटक केली आहे.
अनपरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्रीकांत राय यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी सिदहवां निवासी बबलू केवट आणि त्याची पत्नी शुगिया (२८) यांच्यात भांडण झाले होते. माहिती मिळताच शुगियाचे कुटुंबीय सिदहवां येथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी पंचायत झाल्यानंतर मुलीची समजूत घातल्यानंतर, सकाळी पुन्हा येतो, असे सांगून माहेरची लोकं रात्री नऊ वाजता आपल्या घरी निघून गेले.
कुटुंबीयांनी गुन्हाही दाखल केला होता
सकाळी पुन्हा सिदहवां येथे पोहोचल्यावर बबलूने आपली मुलगी पळून गेल्याचे सांगितले. एका आठवड्यानंतर, बबलू स्वत: अनपरा पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या तीन मुलांच्या संगोपनाचा हवाला देत पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आई-वडिलांनीही सून आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
दोन्ही पक्षांचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपासात गुंतले होते. दरम्यान, मंगळवारी एका ठिकाणी महिलेचे काही कपडे पडलेले आढळून आले. तेथून निघणाऱ्या दुर्गंधीच्या आधारे पोलिसांनी तेथे खोदकाम केले असता, तेथून महिलेचा सांगाडा सापडला. जप्त केलेले कपडे कुटुंबीयांनी शुगियाचे असल्याचं सांगितले.
मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीमुळे शुगियाचा मृत्यू झाल्याचे पतीने सांगितले. नंतर नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतदेह जंगलात नेऊन रात्रीच पुरला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारहाणीत वापरलेली काठीही जप्त केली आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती बबलू केवट, सासरा रामधेन आणि सासू मनबसिया यांना सायंकाळी उशिरा अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.