पानसरे हत्येप्रकरणी आरोपीची साकळीत आणून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:01 PM2018-12-12T22:01:44+5:302018-12-12T22:04:14+5:30
पुरोगामी विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू येथील एसआयटीच्या ताब्यात असलेल्या वासुदेव भगवान सुर्यवंशी (२८) याला बुधवारी दुपारी पथकाने साकळी (ता. यावल) येथे चौकशीसाठी आणले होते.
जळगाव : पुरोगामी विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू येथील एसआयटीच्या ताब्यात असलेल्या वासुदेव भगवान सुर्यवंशी (२८) याला बुधवारी दुपारी पथकाने साकळी (ता. यावल) येथे चौकशीसाठी आणले होते.
दहशतवादविरोधी पथकाने नेमकी काय चौकशी केली. चौकशीत काय निष्पन्न झाले? याबाबत काही एक माहिती मिळू शकली नाही. नाला-सोपारा बॉम्बस्फोटप्रकरणी तीन महिन्यापूर्वी सुर्यवंशी याला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. गेल्या आठवडयात बंगळुरू येथील एसआयटी पथकाने त्याला पानसरे यांच्या हत्येतील मारेक-यांना मोटरसायकल व पिस्तूल पुरवल्याच्या आरोपात अटक केली होती. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वासुदेवला साकळी येथे घरी आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या घरासमोर एकच गर्दी झाली होती. १०-१५ मिनिटात पथकाने त्यास मनवेल रस्त्यावरील शेतशिवार परिसरात नेण्यात आले.
वासुदेव हा गेल्या १० वर्षापासून साकळीमध्ये मोटरसायकल दुरूस्तीचे गॅरेज चालवित होता. त्याला दहशतवादी विरोधी पथकाने साकळी येथून ताब्यात घेतल्याने मोठीच खळबळ उडाली होती.