पानसरे हत्या प्रकरण : सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना एका सुनावणीसाठी दिले जाणार ३५ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:22 PM2019-08-29T20:22:48+5:302019-08-29T20:26:56+5:30
गृह विभागचा हिरवा कंदील
मुंबई - देशभरात खळबळ उडवून दिलेल्या पुरोगामी चळवळीतील कोल्हापूरातील जेष्ठ विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी नेमण्यात आलेल्या सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना सुनावणीसाठी प्रतिदिन ३५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या खटल्यामध्ये जेष्ट विधीज्ञ शिवाजीराव राणे हे सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पहात आहेत.
सनातन संस्था व अन्य हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अॅड.गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये कोल्हापूरात गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून तपास करण्यात येत आहे. यासंबंधीच्या खटल्याचे काम पहाण्यासाठी राज्य सरकारने जेष्ट विधीज्ञ हर्षद निबांळकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी कोल्हापूरातील स्थानिक वकील शिवाजीराव राणे हे काम पहात आहेत. त्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने बनविला होता. त्यानुसार त्यांचे प्रतिदिन सुनावणीसाठी ३० हजार रुपये देण्याचे सूचविले होते. गृह विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे.