पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 01:56 PM2019-04-09T13:56:25+5:302019-04-09T14:07:27+5:30
भार्इंदरच्या नवघर पोलिसांनी रीना मेहता महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
भार्इंदर : मुंबई विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा तृतीय वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलिसांनी रीना मेहता महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचेही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सध्या सुरू आहेत. भार्इंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र आहे. शुक्रवारी ५ एप्रिल रोजी वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर होता. सकाळी १०.३० वा. परीक्षा सुरू होणार होती. त्याआधी सव्वादहाच्या सुमारास शिक्षक मयूर दमासिया हे स्वच्छतागृहात गेले असता तेथे आलोक चतुर्वेदी हा परीक्षार्थी मोबाइलमध्ये काही वाचत होता. दमासिया यांनी त्याला हटकत मोबाइल पाहण्यासाठी घेतला असता त्यात काही वेळाने सुरू होणाऱ्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नांची उत्तरे होती. दमासिया यांनी चतुर्वेदीला तत्काळ प्राचार्य तथा परीक्षा केंद्रप्रमुख केशव परांजपे यांच्या दालनात नेले. परांजपे यांनी मोबाइल पाहिला असता, त्यात अर्थशास्त्राच्या पेपरमधील पहिल्या प्रश्नांची क्रमवार उत्तरं होती. बाराही उपप्रश्नांची उत्तरे क्रमनिहाय होती. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परांजपे यांनी अन्य शिक्षकांच्या साहाय्याने तपासणी सुरू केली असता फरहान खान या परीक्षार्थ्याच्या मोबाइलवरही तीच उत्तरे आढळली.