बारबालांची परेड भोवली; अखेर भालसिंग यांची काशिमीरा पोलीस ठाण्यातून उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:33 PM2019-12-23T21:33:44+5:302019-12-23T21:38:00+5:30
संजय हजारे यांची काशिमीरा पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.
मीरारोड - बारबालांची परेड काढणं काशिमीरा पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेल्या राम भालसिंग यांना भोवली असून अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केले असून संजय हजारे यांची काशिमीरा पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.
भालसिंग हे पूर्वी पासूनच माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काही प्रकरणात मेहता व त्यांच्या निकटवर्तीयना झुकते माप दिल्याने शिवसेनेसह आमदार गीता जैन त्यांच्या पक्षपातीपणाबद्दल नाराज होते. काही प्रकरणात नागरिकांचा संताप व्यक्त झाला होता. परंतु सत्तेत असताना मेहतांचा वरदहस्त असल्याने भालसिंग यांच्या विरोधात तक्रारी होऊन देखील ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप तक्रारदार करत होते.
त्यातच सत्ताबदला नंतर भालसिंग यांना पोलीस अधीक्षक यांनी काशिमीरासारखे क्रीम पोस्टिंग म्हणून ओळखणारे पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, नियुक्तीनंतर भालसिंग यांनी बारबालांची चौकशीनिमित्त परेड काढल्याने त्यांच्यावर काही वर्गातून टीकेची झोड उठली होती. आमदार गीता जैन यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी भालसिंग यांना ठाणे ग्रामीण कंट्रोल येथे हलवले होते. भालसिंग यांनी पुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात नियुक्त करावे यासाठी प्रयत्न चालवले होते. पण आज सोमवारी राठोड यांनी भालसिंग यांची उचलबांगडी करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय हजारे यांची नियुक्ती काशिमीरा पोलीस ठाण्यात केली आहे.