Param Bir Singh: २-३ दिवसांत परमबीर सिंगांवर तेलगी बॉम्ब? ६० हजार कोटींचा घोटाळा येणार चर्चेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:18 AM2021-03-22T03:18:36+5:302021-03-22T03:18:56+5:30
त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका, हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंशी जवळीक भोवल्याने मुंबई सीपी पदावरून उचलबांगडी झालेले आणि नंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब टाकल्याने सर्वत्र चर्चेला आलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आता एक बॉम्ब पडण्याची शक्यता चर्चेला आली आहे.
हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरण १९९९ चे आहे. ठाणे-मुंबई परिसरात एका टोळीकडून पोस्टाची बनावट तिकिटे विकली जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला मिळाली होती. या दिलेर अधिकाऱ्याने त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून तब्बल १५ दिवस वेशांतर करून या टोळीची पुराव्यासहित माहिती मिळविली. त्यानंतर २१ ऑगस्ट १९९९ ला या अधिकाऱ्याने मीरारोड पोलीस चौकीतील एक अधिकारी आणि सहकाऱ्यांसह छापा घालून फुलचंद जैन नामक आरोपीला पकडले. त्याच्याकडून २१ हजारांची बनावट पोस्टाची तिकिटे, महसूल तिकिटे (रेव्हेन्यू स्टॅम्प) आणि रोखे हस्तांतरणासाठी वापरली जाणारी तिकिटे जप्त केली. तेलगी घोटाळ्याचा तो पहिला एफआयआर मीरारोड पोलीस चौकीत (सीआर नंबर २७४/ १९९९) नोंदवला गेला होता. त्यानंतर पुढच्या चार दिवसात अनुक्रमे उमेश खंडेलवाल आणि भाऊसाहेब जगदाळे (जीपीओ, व्हीटी, मुंबई)ला पकडले.
जगदाळे हा पोस्टाचा कर्मचारी होता अन् त्याच्याकडे तिकीट विक्रीचे काऊंटर होते. तो तेलगीनिर्मित अर्धी बनावट तिकिटे विकायचा अन् अर्धी तिकिटे पोस्टाची विकायचा. बनावट तिकिटांच्या विक्रीची रक्कम नंतर या रॅकेटमधील आरोपी वाटून घ्यायचे. जगदाळेने पुन्हा काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरून विजय कदम याला शिवडीत अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तिकिटांना पाडल्या जाणाऱ्या छिद्राची मशीन आणि मोठ्या प्रमाणात बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. यानंतर उदय सावंत हा बडा मासा पकडून याच अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्ट १९९९ ला कुलाब्यातील मिंट रोडवर असलेल्या अक्षर मुद्रणालय येथे छापा घातला. तेथे सुमारे ९८ लाखांची बनावट तिकिटे, मुद्रांक पोलिसांना सापडले.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सील लावण्याची गरज नाही, तुम्ही निघून या, असे म्हटले. अधिकाऱ्यांच्या मते, त्यावेळी ठाणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून परमबीर सिंग होते आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून पाटील ओळखले जात होते. पुढे या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आणि ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. हा सर्व खटाटोप तेलगी आणि साथीदारांना वाचविण्यासाठीच झाला होता अन् तो परमबीर सिंगांच्या इशाऱ्यावरूनच झाला होता, असाही या अधिकाऱ्याचा दावा आहे.
दोन-तीन दिवसांत फुटणार बॉम्ब
याच अधिकाऱ्यांपैकी एकाने लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली असून परमबिर सिंगांमुळे देशाला ६० हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. हा बॉम्ब दोन-तीन दिवसांतच फुटण्याची शक्यता त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर वर्तविली आहे.