मुंबई पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला की परमबीर सिंग; मुख्यमंत्र्यांसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 20:14 IST2019-08-16T20:13:04+5:302019-08-16T20:14:09+5:30
मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला की परमबीर सिंग; मुख्यमंत्र्यांसमोर पेच
मुंबई - मुंबई पोलीसआयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण मुंबई शहराचं पोलीस आयुक्त आयपीएस अधिकाऱ्यांचं स्वप्न असत. मात्र, मुंबईला पहिल्यांदाच महिला पोलीस आयुक्त मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रश्मी शुक्ल या सध्या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त आहेत. ३१ ऑगस्टला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे निवृत्त होत असून त्यांना मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती मिळत आहे.
सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याने नव्या अधिकाऱ्याची आयुक्त पदी नेमणूक करण्यात येईल. या पदासाठी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याव्यतिरिक्त लाचलुचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक परमबीर सिंह यांचे देखील नाव चर्चेत आहे.
रश्मी शुक्ला यांनी याआधी पुणे शहराचे आयुक्तपद सांभाळलेले आहे. सध्याचे आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचा आहे. बर्वे यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. सुबोध जायसवाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळेसही परमबीर सिंह यांचे नाव आयुक्तपदाच्या शर्यतीत घेतले जात होते. सुबोध जायसवाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आणि १९८७ बॅचचे संजय बर्वे, बिपीन बिहारी, एस. एन. पांडे, हेमंत नगराळे हे आहेत तर परमबीर सिंग, रश्मी शुक्ला, रजनीश शेठ आणि के. वेंकटेशम हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.