Parambir Singh: परमबीर सिंहला हवे होते रोज २ कोटी, पण कोरोनामुळे जमत नव्हते; वाझेकडून धमकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:53 AM2021-08-22T06:53:59+5:302021-08-22T06:54:24+5:30
Parambir Singh: ११.९२ लाखाच्या खंडणी वसुलीबद्दल या दोघांसह ६ जणांविरुद्ध पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. वाझेने एनआयए कोठडीतून न्यायालयाला लिहिलेले पत्रातील माहिती चुकीची असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
- जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दर महिन्याला १०० कोटीच्या कथित वसुलीचा ‘लेटर बॉम्ब’ टाकून राज्यात खळबळ उडवून दिलेल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आता ‘बुमरँग’ होण्याची शक्यता आहे. त्यांनी रोज २ कोटी कलेक्शन करण्याचे आदेश सचिन वाझेला दिले होते. त्यानेच आपल्याला ही माहिती दिली होती, असा दावा बिल्डर व हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवालने केला आहे.
११.९२ लाखाच्या खंडणी वसुलीबद्दल या दोघांसह ६ जणांविरुद्ध पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. वाझेने एनआयए कोठडीतून न्यायालयाला लिहिलेले पत्रातील माहिती चुकीची असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
अग्रवालने जबाबात म्हटले आहे की, गेल्या वर्षी ३१ ऑगस्टला वाझेने कांदिवली युनिट-११च्या कार्यालयात बोलावून सांगितले की, एक नंबरचे म्हणजे परमबीर यांचे कोरोनामुळे ६ महिन्यांच्या कमाईचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी मला आता रोज २ कोटी कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यासाठी त्यांचे खूप प्रेशर आहे, त्यासाठी सगळ्या बुकी, बार व हॉटेलवाल्याशी सेटिंग करायची आहे. त्यासाठी तू मदत केली पाहिजेस, नाहीतर तुझे हॉटेल चालवू देणार नाही. मुंबईतील हॉटेलवर रेड करू शकतो. त्याच्या धमकविण्यामुळे मी त्याला बार कलेक्शनसाठी महेश शेट्टी व बुकीकडून वसुलीसाठी नारायण भाई यांची नावे दिली. नारायणला युनिट ११च्या ऑफिसमध्ये बोलावून आम्ही व प्रभारी निरीक्षक सुनील मानेसोबत चर्चा केली. यावेळी बुकीचे सर्व कलेक्शन परमबीर सिंह यांच्यासाठी करायचे, त्यातील ७५ टक्के रक्कम त्यांना तर २५ टक्के आपण सर्व वाटून घेऊ, त्याशिवाय अन्य कोणत्याही पोलीस स्टेशन, क्राईम ब्रँच, एटीएसला पैसे द्यायचे नाहीत, असे वाझेने नारायणला सांगितले होते, मात्र त्याच्याकडून सेटलमेंट न झाल्याने वाझेने काही ठिकाणी रेड टाकली, असे अग्रवालने जबाबात म्हटले आहे.
दुबईत नको, इथेच बेटिंग लावा !
बुकीचे कलेक्शन करण्याची जबाबदारी दिलेल्या नारायणला वाझेने सांगितले होते की, सर्व सेटिंग झाल्यास बुकींनी दुबईला जाऊन नव्हे तर त्यांनी इथेच हाॅटेलमध्ये बसून बेटिंग घ्यावे, दार उघडे ठेवून घेतले तरी कोणी कारवाई करण्याची हिम्मत करणार नाही, अशी ऑफर दिली होती.