परमबीर सिंग यांचं 'गुजरात' कनेक्शन उघड, हवाला ऑपरेटरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:53 PM2021-10-25T21:53:40+5:302021-10-25T21:54:16+5:30
Parambir Singh : पोलिसांच्या हाती परमबीर सिंग यांच्याविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं मानलं जातं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याभोवतीचा फास आता आवळत चालला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातल्या एका आरोपीला पोलिसांनी रात्री गुजरातमधून अटक केली आहे. अल्पेश पटेल असं त्याचं नाव असून परमबीर सिंग यांनी त्याच्यामार्फत खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती परमबीर सिंग यांच्याविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं मानलं जातं आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात महिन्याभरात दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात ही तक्रार दिली होती. विमल अग्रवाल हे बोहो आणि ओशिवरा इथे बीसीबी हा रेस्टॉरंट आणि बार भागीदारीमध्ये चालवतात. वाझेनं विमल यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. परमबीर सिंग यांनी दररोज दोन कोटींच्या वसुलीचे लक्ष्य दिलं आहे, असं वाझेनं विमल यांना सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. बार चालवायचा असेल, तर पैसे द्यावे लागतील असं वाझेनं परमबीर यांच्या सांगण्यावरुन धमकावलं होतं.
जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९ लाख रुपये रोख, सॅमसंग कंपनीचे दोन महागडे मोबाइल घेतल्याचा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला. त्यावरून पोलिसांनी परमबीर सिंह, सचिन वाझे याच्यासह सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला.खंडणीच्या या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याचा सहभाग निश्चित होताच पोलिसांनी त्याला अटक केली. पटेल याला गुजरातच्या मेहसाणा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं. पटेल याच्या चौकशीतून बरीच माहिती आणि पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सिंह यांच्या अडचणी वाढणार आहेत. याप्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी तुरुंगात असलेल्या सचिन वाझेचा चौकशीसाठी ताबा मिळावा म्हणून कोर्टात जाण्याचीही शक्यता आहे, अशीही माहिती मिळत आहे.