Video : परभणीतील एटीएम केंद्र जळाले नसून जाळले; दोन मशीनमध्ये होते २३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:35 PM2019-12-05T18:35:03+5:302019-12-05T18:59:46+5:30
ज्वलनशील द्रव्य टाकून माथेफिरूने लावली आग
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील एटीएम केंद्राला आग लागली नसून एका माथेफिरूने ही आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले असून, या घटनेत १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार बँक अधिकाऱ्याने नवा मोंढा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर स्टेट बँकेच्या एटीएम केंद्राला ४ डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार चौधरी, चारूदत्त पी. विश्वासराव, गंगाप्रसाद साधू, कालिदास रणदिवे, दुलालचंद्र मंडल, शेख अमजद, सरदार खान, रमेश खवले, विश्वास खोले या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर शैलेंद्रकुमार चौधरी यांनी नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, एक व्यक्ती हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टीकची कॅन घेऊन एका खोलीतील दोन्ही एटीएम मशीनवर कॅनमधील ज्वलनशील द्रव्य टाकून आग लावून बाहेर येताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने डोक्यावर आणि तोंडावर पांढरा रुमाल बांधलेला असून, निळ्या रंगाचे जॅकेट व फिकट निळ्या रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे.
या घटनेत दोन एटीएम मशीन अंदाजे १० लाख रुपये, फर्निचर, युपीएस ३ लाख रुपये असे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट तपास करीत आहेत. या प्रकरणात तपास सुरू असून, आरोपीला शोधण्यात लवकरच यश मिळेल, असे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी सांगितले.
एटीएममध्ये २३ लाखांची रक्कम
इंडिया बँकेच्या या एटीएम केंद्रातील एका मशीनमध्ये ३ डिसेंबर रोजी २० लाख रुपये जमा करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या मशीनमध्ये २७ नोव्हेंबर रोजी २२ लाख रुपये जमा केले होते. ४ डिसेंबर रोजी पहिल्या मशीनमध्ये १९ लाख ३५ हजार ८०० रुपये आणि दुसऱ्या मशीनमध्ये ३ लाख ६२ हजार ७०० रुपये असे एकूण २२ लाख ९८ हजार ५०० रुपये शिल्लक होते. मात्र या पैकी किती रक्कम जळाली ही माहिती मशीन उघडल्यानंतरच स्पष्ट होईल, असे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.