दोन चिमुकल्यांना कचऱ्यात टाकणारे माता-पिता जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:48 AM2020-01-22T06:48:59+5:302020-01-22T06:49:10+5:30
पाषाण तलावाच्या जवळील कच-यात टाकून दिलेल्या जुळ्या भावंडांच्या पाषाणहदयी माता-पित्यांचा शोध चतु:श्रृंगी पोलिसांनी लावला
पुणे : पाषाण तलावाच्या जवळील कच-यात टाकून दिलेल्या जुळ्या भावंडांच्या पाषाणहदयी माता-पित्यांचा शोध चतु:श्रृंगी पोलिसांनी लावला असून, त्यांना अटक केली आहे. प्रेमसंबंधामधून या मुलांचा जन्म झाल्याची बाब समोर आली आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जानेवारीला पाषाण तलावाजवळ रस्त्यावरील कचºयात दोन जिवंत जुळी नवजात बालके सापडली होती. त्यात एक स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे बालक होते. त्या दोघांना सांभाळण्यास असमर्थता दाखवून कचºयात फेकून दिल्याचे समोर आले आहे. परिसरातील नागरिकांमुळे आणि तेथील श्वानांमुळे ही दोन्ही चिमुकली सुखरूप होती. त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.
चतुशृंगी पोलीस तपास पथकाने घटनेचा तपास केल्यानंतर शहरातील रूग्णालयांना भेटी देऊन माहिती घेतली. या तपासात जननी नर्सिंग होम, कर्वेनगर येथे १३ जानेवारी रोजी एका पुरूषाने महिलेला बाळंतपणासाठी दाखल केले होते. या महिलेला पहाटे ४.१० वाजता एक मुलगा व एक मुलगी झाली. त्यानंतर १४ रोजी हॉस्पिटलमध्ये कोणालाही काहीही न सांगता दोन्ही बाळांना घेऊन ते निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी पाषाण येथील कचºयात त्यांना टाकून दिले होते.
तांत्रिक विश्लेषणावरून संबंधित महिला व तिचा प्रियकर यांना वडगाव येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
महिलेला आधीच्या पतीपासून तीन मुली
महिला एकटी राहत होती. तिच्या पतीचे निधन झालेले असून, त्यापासून तिला तीन मुली आहेत. त्या मुलींना हॉस्टेलवर ठेवलेले आहे. तिचे ३० वर्षीय तरूणाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्यातून दोन जुळी मुले झाली. दोन्ही बाळांना सांभाळणे कठीण जाईल, म्हणून दोघांनी त्यांना कचºयात टाकले. महिला घरकाम करते आणि तरूण पेटिंगचे काम करतो.