हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी पार्क करताय? सावधान! पार्किंगमधून कर्मचारीच करतात वस्तू गायब
By गौरी टेंबकर | Published: January 7, 2024 06:23 AM2024-01-07T06:23:53+5:302024-01-07T06:24:20+5:30
वाॅलेट पार्किंगमधून कर्मचारीच करतात मौल्यवान वस्तू गायब...
गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हाॅटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वाॅलेट पार्किंगसाठी गाडीची चावी विश्वासाने कर्मचाऱ्याच्या हाती सोपवतो. मात्र, हाच विश्वास अनेकांना महागात पडत आहे. वाॅलेट पार्किंगमधून कर्मचारीच वाहनातील किमती ऐवजावर हात साफ करत असल्याचा प्रकार एमएचबी कॉलनी पोलिसांच्या कारवाईतून समोर आला. त्यामुळे वाॅलेट पार्किंगमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बीकेसीमध्ये एमएमआरडीएची पे अँड पार्क व्यवस्था आहे. याठिकाणी वाहनांचे दर बोर्डनुसार सांगितले. मात्र, पैसे काढण्यासाठी कर्मचारी वाॅलेट पार्किंगचा आधार घेताना दिसले. चावीची काळजी घ्यायची असल्यास वाॅलेट पार्किंग घ्यावी लागेल सांगून त्याचे दर बोर्डच्या दरापेक्षा दुप्पट असल्याचे दिसून आले. ही मुले रस्त्याच्या ठिकठिकाणी बसलेली असतात. त्यांच्याकडे चौकशी करताच तेही एमएमआरडीएसाठी काम करत असल्याचे सांगतात. रस्त्याकडेला वाहन पार्क होताच ही मंडळी त्यांच्याकडून चावी घेत पार्किंगसाठी येथील पे अँड पार्ककडे आणतात.
काय काळजी घ्याल?
- मौल्यवान वस्तू, रोख रक्कम किंवा महत्त्वाची कागदपत्रे गाडीत ठेवू नका.
- चावी अनोळखी व्यक्तीला न देता गाडी स्वतः पार्क करा.
- पार्क गाडीचा आणि तुमचा मोबाइल नंबर अटेंडन्टला द्या. जेणेकरून काही समस्या असल्यास तो तुम्हाला संपर्क करेल.
तुमची कार वाॅलेट पार्किंगसाठी दिली आणि ती गायब झाली तर त्या चोरीसाठी संबंधित हाॅटेल जबाबदार राहील. कारमधील ऐवजाची जबाबदारी गाडीच्या मालकाची असेल.
- ॲड. विशाल सक्सेना, सर्वोच्च न्यायालय
आमच्याकडे वाॅलेट पार्किंग चोरी प्रकरण दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही ताब्यात घेतले. तो गेल्या २० वर्षांपासूनचा कर्मचारी असल्याने मालकाचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तक्रारदाराची गाडी तो पुढे-मागे करताना दिसला व फसला. त्यामुळे असा काही प्रकार घडल्यावर आधी पोलिसांकडे तक्रार करा.
- सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमएचबी काॅलनी ठाणे
पालिकेचे पे अँड पार्क जिते आहे तेथील पार्किंगचे दर बऱ्याच लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे ते रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्क केल्या जातात. ते कमी केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. पार्किंग प्लॉट नेमके कुठे उभारता येतील, याबाबतही मी संबंधितांना पत्रव्यवहार केला आहे.
- ॲड. गॉडफ्रे पीमेंटा, समाजसेवक
यापूर्वीच्या घटना
- डिसेंबर, २०२३ : बोरिवली पश्चिमेच्या फ्यूजन किचन हॉटेलमध्ये इनोव्हा गाडी घेऊन दर्शिल डोडिया (वय ३४) हे जेवायला आले. तेव्हा त्यांनी गाडी रमेश बंडू शिंदे (३३) या वाॅलेट पार्किंग कर्मचाऱ्याला दिली. त्याने त्यांच्या गाडीतून बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अखेर, एमएचबी कॉलनी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने शिंदे याला अटक करत चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले.
- एप्रिल, २०२३ : वांद्रे पश्चिमेच्या हॉटेल वाॅटर येथे जेवायला गेलेल्या करणराज साही (३९) यांची सिक्युरिटी एजन्सी आहे. ते बिझनेस पार्टनरसोबत जेवायला गेले असताना त्यांनी त्यांची गाडी वाॅलेट पार्किंगसाठी दिली. त्यावेळी त्यातून इअरपॉड, मॅकबुक तसेच रोख २० हजार रुपये चोरण्यात आले. या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.