9 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोपटाने दिली साक्ष; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 01:23 PM2023-03-24T13:23:52+5:302023-03-24T13:24:22+5:30
Agra News: आग्रा येथे 2014 साली महिलेची निर्घृण हत्या झाली होती, त्या प्रकरणात कोर्टाने 9 वर्षानंतर शिक्षा सुनावली आहे. वाचा संपूर्ण कहाणी...
आग्रा : पोपट हा असा पक्षी आहे, जो माणसांप्रमाणे बोलू शकतो आणि त्याची स्मरणशक्तीही अतिशय तीक्ष्ण असते. त्याने एखादी गोष्ट एकदा पाहिली किंवा ऐकली तर तो विसरत नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या खटल्यात पोपटाच्या साक्षीवरुन आरोपींना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे. नीलम शर्मा नावाच्या महिलेची नऊ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोपटाच्या साक्षीवरुन न्यायालयाने आता मृत महिलेचा भाच्चा आशुतोष गोस्वामी आणि त्याचा मित्र रॉनी मॅसी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जाणून घ्या प्रकरण?
नीलम शर्मा आपल्या कुटुंबासोबत आग्रा येथे राहत होत्या. 20 फेब्रुवारी 2014 रोजी नीलम यांचे पती विजय शर्मा, त्यांची मुलगी आणि मुलगा फिरोजाबाद येथे लग्नासाठी गेले होते. नीलम घरी एकट्याच होत्या. त्यांच्यासोबत घरात पाळीव कुत्रा आणि पोपट होते. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना नीलम आणि पाळीव कुत्रा जॅकी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्या दोघांचाही चोकूने भोसकून खून केला होता. तसेच, घरातून सर्व दागिने आणि रोख रक्कमही चोरीला गेले होते.
पोपटाने केला खुलासा
महिलेच्या मृत्यूनंतर घरातील पोपट टोटोही पूर्णपणे शांत झाला होता. नीलम पोपटावर खूप जीव लावायच्या. पोपट अचानक शांत झाल्यामुळे घरच्यांना संशय आला. एके दिवशी पती विजय आणि मुलगी पोपटासमोर रडायला लागल्या आणि संतापून पोपटाला विचारले, 'नीलमचा खून झाला आणि तू काहीच करू शकत नाहीस, नीलमला कोणी मारले ते सांग.' यानंतर विजयने पोपटासमोर त्या सर्व लोकांची नावे घेतली, ज्यांच्यावर संशय होता. यावेळी भाच्चा आशूचे नाव घेताच पोपट जोरजोरात ओरडू लागला.
आरोपीची पोलिसांसमोर कबुली
आशूचे नाव ऐकताच टोटो आशू-आशू ओरडायला लागला. आशूनेच नीलमची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा संशय खरा ठरला. यानंतर विजय शर्माने याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आशुला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने त्याचा मित्र रॉनी मॅसीसोबत हा खून केला होता. नीलमचे तिच्या मुलापेक्षा तिच्या भाच्च्यांवर जास्त जीव लावला होता. आशुला घरात ठेवलेल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पैशाच्या लालसेपोटी त्याने माउशी नीलम यांची हत्या केली. आशूने नीलमवर चाकूने 14 वार केले. हा संपूर्ण प्रकार पोपटाच्या डोळ्यासमोर घडत होता. पोपटाच्या साक्षीमुळेच पोलिस आशूपर्यंत पोहोचू शकले.