'क्रौर्याची परिसीमा', वानराची शिकार करुन केली पार्टी ; जुन्नर येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:52 IST2020-06-12T17:29:04+5:302020-06-12T17:52:13+5:30
लॉकडाऊनच्या काळात सर्वच मटणाची दुकाने बंद असल्याने त्यांनी वानराची शिकार केली.

'क्रौर्याची परिसीमा', वानराची शिकार करुन केली पार्टी ; जुन्नर येथील धक्कादायक घटना
पुणे : वानराची शिकार करुन ते खाणाऱ्या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वानराचा पाठलाग करुन गलोलच्या साह्याने माकडाला मारुन त्याचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. जुन्नर वनपरिक्षेत्रातील मौजे धालेवाडी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.
एकनाथ गोपाळ आसवले (वय 29, रा. फुलवडे, ता.आंबेगाव, जि.पुणे), गणपत शिमगे हेलम (वय 40, रा.धालेवाडी तर्फे मिन्हर, ता.जुन्नर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुन्नर वनपरिक्षेत्रातील मौजे धालेवाडी येथे वानराची शिकार करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
आरोपींना गुरुवारी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. इतर फरार आरोपीचा शोध सुरु आहे. वानर या वन्यप्राणाची शिकारप्रकरणी 3 वर्षे कैद व 25 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतुद आहे.