पार्टीची झिंग सीईओच्या जीवावर, वरळी सी फेस अपघातप्रकरणी चालकाला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:18 AM2023-03-21T10:18:14+5:302023-03-21T10:18:29+5:30
आई हिमाचल प्रदेशात गेली म्हणून मित्र मैत्रिणीसोबत पार्टी करून तो मैत्रिणीला सोडविण्यासाठी जात असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने राजलक्ष्मी यांना उडविल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : अल्ट्रुइस्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजलक्ष्मी राजकृष्णन यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी सुमेर मर्चंटला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मर्चंट हा दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आई हिमाचल प्रदेशात गेली म्हणून मित्र मैत्रिणीसोबत पार्टी करून तो मैत्रिणीला सोडविण्यासाठी जात असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने राजलक्ष्मी यांना उडविल्याची माहिती समोर आली आहे.
माटुंगा परिसरात राहणाऱ्या राजलक्ष्मी रविवारी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. सकाळी सहा वाजता वरळी डेअरीजवळ त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुमेर मर्चंटला अटक केली. मर्चंट हा ताडदेव येथील रहिवासी असून, मनोरंजन कंपनीत नोकरीला आहे. त्याचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करतात. आई हिमाचलला गेल्यामुळे १५ जणांनी त्याच्या ताडदेव येथील घरी पार्टी केली. तेथे नशापाणी करत रात्रभर धिंगाणा सुरू होता. त्यानंतर, मैत्रिणीला सोडण्यासाठी वरळी डेअरीजवळून टर्न घेत असताना त्याने राजलक्ष्मी यांना उडविले.
यामागे पूर्ववैमनस्य, हत्येची सुपारी किंवा घातपात आहे का? या दिशेनेही पोलिस तपास करीत असल्याची माहिती न्यायालयात दिली. तसेच, मर्चंटच्या म्हणण्यानुसार, त्याने सात वाजता मद्याची नशा केली. त्यानंतर नशा केली नसल्याचे सांगितले. मात्र, त्याने नेमकी कसली नशा केली होती? याबाबत वैद्यकीय तपासणी केली असून अहवालानंतर माहिती समोर येईल, असेही न्यायालयात सांगितले. तसेच,
नेमका वेग किती होता? याबाबतही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर मर्चंटला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तो लॉँग कट ठरला अखेरचा...
रविवारी सकाळी पाच वाजता राजलक्ष्मी त्यांच्या पती विजयसोबत रेसकोर्स येथे जॉगिंगला गेल्या होत्या. तेथे त्यांना त्यांचे इतर मित्र भेटले. त्यांनी तेथे जॉगिंग आणि नेहमीप्रमाणे व्यायाम देखील केला. त्यांचे नेहमीचे व्यायाम आणि कसरती संपल्यानंतर हे जोडपे नंतर रेसकोर्स येथून परत निघाले.
त्यानंतर विजय पुन्हा पेडर रोडच्या दिशेने आणखीन जॉगिंग करण्यास निघाले, तर राजलक्ष्मी यांनी घरी परतण्यापूर्वी मोठा लॉंग कट निवडत धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या वरळी सी फेसजवळ पोहोचल्या. हाच लॉन्ग कट अखेरचा ठरल्याने सर्वांना धक्का बसला असल्याची माहिती समोर येत आहे.