कायद्याच्या परीक्षेला बसलेला नसतानाही केलं पास; तब्बल १६ महिन्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:26 AM2020-10-11T02:26:33+5:302020-10-11T02:26:45+5:30
शेडुंग टोलनाक्याजवळ असलेल्या सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठ संलग्न विधी कायदा अभ्यासक्रम शिकवला जातो.
नवीन पनवेल : पेपरला बसलेला नसतानाही पास केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमधील महाविद्यालयात घडला आहे. विद्यालयाचे प्राचार्य राजेश साखरे आणि तत्कालीन सहायक प्राध्यापिका मालती गाडे यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेडुंग टोलनाक्याजवळ असलेल्या सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठ संलग्न विधी कायदा अभ्यासक्रम शिकवला जातो. मुंबई विद्यापीठाने विधी शाखेच्या परीक्षाअंतर्गत महाविद्यालयामार्फत घेण्याचे परिपत्रक १७ मे २०१८ रोजी प्रसिद्ध केले होते. याच महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थी बाबाजी रभाजी भोर हा कोणतीही परीक्षा न देता तसेच कोणत्याही परीक्षेला न बसता विधी कायद्याची द्वितीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. खोटे सर्टिफिकेट बनवून फसवणूक केल्याची तक्रार सागर कांबळे यांच्याकडून २७ मे २०१९ रोजी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तब्बल १६ महिन्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलएलबी सेमिस्टर ४चे ज्यूरिसप्रूडन्स, कॉन्ट्रॅक्ट २, लँड लॉ आणि क्रिमिनोलॉजी हे चार पेपर घेण्यात आले. तर एलएलबी सेमिस्टर ३ चे एटीकेटीचे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, फॅमिली लॉ २, ट्रान्सफर आॅफ प्रॉपर्टी अॅक्ट आणि कंपनी लॉ या चार पेपरची परीक्षा घेण्यात आली. या एकूण आठही पेपरच्या परीक्षेला बाबाजी भोर अनुपस्थित असताना त्याला हजर दाखवून त्याला या परीक्षांमध्ये पास झाल्याचे दाखविले. हजेरीपटात खाडाखोड करण्यात आली. तसेच निकालाचे शेवटचे पान बदलून त्यावर भोरचे नाव आणि गुण समाविष्ट करण्यात आले. यावर प्राचार्य यांची सही आणि शिक्का आहे. तर रिझल्ट करण्याचे काम मालती गाडे यांना देण्यात आले होते. ही बाब कांबळे यांनी प्राचार्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र उत्तर न आल्याने मे २०१९ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.