मोबाईल चोरी जीवावर बेतली; जुळ्या भावांसह एका महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 08:44 PM2019-07-09T20:44:44+5:302019-07-09T20:45:54+5:30
दोन्ही आरोपी एकमेकांची ओळख लपवून पोलिसांना गुंगारा देत असत.
मुंबई - चर्नीरोड रेल्वे स्थानकात मोबाइल चोराला पकडताना धावत्या लोकलमधून पडलेल्या ५३ वर्षीय शकिल शेख यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन जुळ्या भावांसह एका महिलेला अटक केली आहे. दोन्ही आरोपी एकमेकांची ओळख लपवून पोलिसांना गुंगारा देत असत.
नालासोपारा येथील संतोष नगर झोपडपट्टीत राहणारा मुख्य आरोपी शिवम कृष्णासिंह याचं मोबाइल चोरतानाचे सीसीटिव्ही वायरल झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसही कामाला लागले होते. दरम्यान, वांद्रे पोलिसांनी सत्यम कृष्णा सिंह याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यावेळी सत्यमने तो मी नसून माझा भाऊ असल्याचे सांगत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमकडून माहिती मिळताच पोलिसांनी नालासोपारा येथून शिवमला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
हे दोघेही अल्पवयीन असल्यापासून चोऱ्या करत असून यातील शिवमविरोधात १७ तर सत्यमविरोधात ४ गुन्ह्यांची नोंद आहे. दरवेळी पोलिसांनी या दोघांपैकी एकाला पकडल्यास दोघेही एकमेकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देत असत. या गुन्ह्यातही हे दोघे पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या वेळी गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन असल्यामुळे या दोघांची जामिनावर मुक्तता होत असे. शिवम हा ४ महिन्यांपूर्वीच चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आला तर सत्यम ९ महिन्याची शिक्षा भोगून आला आहे. या दोघांचे वडीलही अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत आहेत.शकिल यांचा मोबाइल या दोघांनी मस्जिद बंदर येथील फैरूजा खान या महिलेला विक्रीसाठी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी तिलाही या प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी दिली.
मुंबई - चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2019