खळबळजनक! रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:46 PM2021-06-28T20:46:19+5:302021-06-28T20:47:00+5:30
Suicide Case : रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (२८ जून) पहाटे ही घटना घडली.
अंबाजोगाई : विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्या रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (२८ जून) पहाटे ही घटना घडली.
प्रकाश उत्तम राठोड (वय ३६, रा. साकूड, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून प्रकाशने शनिवारी (२६ जून) विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याच्यावर पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. परंतु, सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास प्रकाशने बांधलेले हात कसेबसे मोकळे केले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आले. त्यानंतर समोरच असलेल्या डायलीसीस विभागातील शौचालयात तो गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने अपघात विभागात दाखल केले असता तिथे उपचारा दरम्यान पहाटे ३ वाजता प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशच्या पत्नीच्या जबाबावरून अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.