…अन् भरसभेत व्यासपीठावरून खाली उतरून महिला आमदाराने युवकाच्या कानशिलात लगावली
By प्रविण मरगळे | Published: February 2, 2021 09:13 AM2021-02-02T09:13:02+5:302021-02-02T09:15:03+5:30
महिला आमदाराकडे पाहून अश्लिल इशारे करणारा आरोपी ४ मुलांचे वडील आहेत. या प्रकाराची पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचं महिला आमदाराने सांगितले.
पटणा – एका महिला आमदाराने युवकाला भरसभेत कानशिलात लगावल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. हा युवक महिला आमदारासमोर अश्लिल चाळे करत होता, युवकाच्या या कृत्याला संतापून महिला आमदाराने व्यासपीठावरून खाली उतरून युवकाच्या कानाखाली मारली. पटणाच्या जवळील एका गावात ही घटना घडली, महिला आमदार ३० जानेवारीला विधानसभा मतदारसंघातील गावात क्रिकेट सामन्यांचे उद्धाटन करण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी कार्यक्रमात आणखी एक पुरुष आमदार सहभागी झाले होते, घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी महिला आमदारावरच दबाव टाकण्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस येत आहे. या महिला आमदाराचं म्हणणं आहे की, युवक सतत माझ्याकडे बघून अश्लिल चाळे करत होता, सुरुवातीला मी त्याच्यावर नजर हटवली आणि त्याला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या युवकाची हिंमत आणखी वाढली आणि त्याने मर्यादा ओलांडली. ज्यावेळी त्याची कृत्ये थांबली नाहीत तेव्हा महिला आमदाराने जोरदार कानशिलात लगावली. घडलेल्या प्रकारानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला. काही वेळानंतर आमदार घटनास्थळावरून निघून गेले.
माहितीनुसार, महिला आमदाराकडे पाहून अश्लिल इशारे करणारा आरोपी ४ मुलांचे वडील आहेत. या प्रकाराची पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचं महिला आमदाराने सांगितले. या घटनेचा निषेध करणे यासाठी गरजेचे आहे कारण हा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आहे. जर अशा घटनांना वेळीच आळा घातला नाही तर चुकीच्या माणसांची हिंमत आणखी वाढेल. ते दुसऱ्यांच्या आयाबहिणींच्या इज्जतीशी खेळतील अशी प्रतिक्रिया महिला आमदाराने दिली आहे.
इतकचं नाही तर या घटनेनंतर काही लोकांना युवकाविरोधात तक्रार करू नये यासाठी दबाव आणला. आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने त्याने केलेल्या कृत्याला दुर्लक्ष करावे असं लोकांचे म्हणणं होतं, तर काहींनी आमदाराने भरसभेत कानशिलात लगावली त्यावरून नाराजी व्यक्त करत आमदाराला लोकांना मारण्यासाठी निवडून दिले नाही असंही म्हटलं जात आहे.