पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांविरोधात साक्ष देणाऱ्या महिलेला बलात्काराच्या धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:44 AM2022-07-31T06:44:51+5:302022-07-31T06:45:09+5:30
साक्षीदार महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी त्यांना दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ईडीकडून तपास सुरू असलेल्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणातील साक्षीदाराने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब मागे घेण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र नोंद करत तपास सुरू केला आहे.
साक्षीदार महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी त्यांना दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. ईडीने गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे माजी संचालक प्रवीण एम राऊत यांच्याकडे पालघर, सफाळे, पडघा येथील जमीन, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील भूखंड या मालमत्ता जप्त केल्या.
किहीम बीचवरील जागा वर्षा आणि सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना यांच्या नावावर आहे. त्यामुळे याबाबत ईडी ने केलेल्या चौकशीत राऊत यांचे नाव मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत बलात्कार, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या पाटकर यांना मिळत आहेत. वाकोला पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर दखलपात्र नोंद करत तपास सुरू केला आहे.