सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:16 AM2022-07-18T06:16:29+5:302022-07-18T06:17:11+5:30

विशेष म्हणजे या तक्रारदारांमध्ये सुशिक्षित- उच्चशिक्षितांचा भरणा लक्षणीय आहे. एकट्या मुंबई शहरातच ४० गुन्हे दाखल झाले आहेत.

pay attention did you get the power cut message and thief looting the common people | सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट

सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रिय ग्राहक, तुम्ही गेल्या महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. त्यामुळे रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी तुमच्या भागातील वीजपुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क साधा, असा मेसेज मोबाइलवर झळकतो आणि वीज ग्राहकाची तारांबळ उडते. मेसेजमध्ये नमूद असलेल्या क्रमांकावर तो तातडीने फोन करतो आणि तिथेच जाळ्यात अडकतो... पुढच्या काही वेळातच त्याच्या बँक खात्यातील जमापुंजी गायब होते... हा वाईट अनुभव येणाऱ्यांची संख्या आताशा वाढू लागली आहे.

लोन ॲपपाठोपाठ गेल्या काही दिवसांत थकीत वीज बिलासंदर्भातील मेसेज आणि त्याद्वारे झालेली फसवणूक याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या तक्रारदारांमध्ये सुशिक्षित- उच्चशिक्षितांचा भरणा लक्षणीय आहे. महिनाभरात एकट्या मुंबई शहरातच ४० गुन्हे दाखल झाले आहेत. पवईतील हरविंदर लथुरा (६२) यांचीही अशीच फसगत झाली. ३१ मे रोजी त्यांना दुपारी थकीत वीज बिलासंदर्भातील मेसेज आला. त्यांनी तत्काळ संबंधित फोन नंबरवर संपर्क साधला. संबंधिताने वीजपुरवठा विभागाकडून बोलत असल्याचे सांगून, सुरुवातीला ‘एनी डेस्क ॲप’ डाउनलोड करण्यास भाग पाडले. पुढे त्याच्या सांगण्यावरून अन्य माहिती भरली. एक लिंक पाठवून त्यावर एक रुपया पाठविण्यास सांगितले. लथुरा यांनी त्यानुसार पैसे पाठवले असता आठ व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून तब्बल ४ लाख ३९ हजार रुपये लंपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुहा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. अशाच प्रकारे अनेक जण या ठकांच्या जाळ्यात अडकत असून, सावध राहण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

ज्येष्ठ नागरिक लक्ष्य 

फसवणुकीच्या या प्रकारात एकतृतीयांश ज्येष्ठ नागरिक ठकांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दाखल होत असलेल्या घटनांमधून समोर येत आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

उच्चशिक्षितही सहज जाळ्यात 

वीजपुरवठा खंडित होण्याच्या भीतीने डॉक्टर, इंजिनिअर्स, नौदल अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक, सेल्समन, विकासक, अशी मंडळीही जाळ्यात अडकल्याचे आढळून आले आहे. 

शंका आल्यास काय कराल?

काही शंका व तक्रारी असल्यास वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा.

Web Title: pay attention did you get the power cut message and thief looting the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.