पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:25 AM2019-07-24T02:25:51+5:302019-07-24T02:26:16+5:30
सीसीटीव्ही फूटेज दोषारोपपत्राला जोडले : सुसाइड नोटमध्ये दोन मोठ्या घटनांचा उल्लेख
मुंबई : पायल तडवी आत्महत्या प्रकरणी क्राइम ब्रँचने तिन्ही डॉक्टर आरोपींवर मंगळवारी विशेष न्यायालयात सुमारे १८०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, या तिन्ही डॉक्टर आरोपींच्या जामिनावर उच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी घेणार आहे.
या दोषारोपपत्रात पायल तडवीने लिहिलेल्या सुसाइड नोटची प्रत आहे. तडवीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती आली नसली तरी तडवीने त्या सुसाइड नोटचे मोबाइलमधून फोटो काढले होते. फॉरेन्सिक लॅबला तिच्या मोबाइलमधून सुसाइड नोटचा फोटो मिळाला आहे. त्या नोटची तीन पाने दोषारोपपत्राला जोडण्यात आली आहेत.
२२ मे रोजी पायलला संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी हेमा आहुजाचा फोन आला होता. या दोघी फोनवर १२१ सेकंद बोलल्या. त्यानंतर ५ वाजून ०४ मिनिटांनी पायललने तिच्या सुसाइड नोटचा मोबाइलमध्ये फोटो घेतला. त्याशिवाय पायलच्या रूमबाहेरील सीसीटीव्ही फूटेजही दोषारोपपत्राला जोडले आहे. पायलने आत्महत्या केल्यानंतर आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिच्या रूमवर गेल्या होत्या. आठव्या मजल्यावर तडवीची रूम होती. तडवीला ट्रामा सेंटरमध्ये नेण्यासाठी लिफ्टपर्यंत या तिघी आल्या. त्यानंतर पुन्हा या तडवीच्या रूममध्ये गेल्या. त्यामुळे या तिघींनी तडवीची सुसाइड नोट नष्ट केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
तडवीने तिच्या सुसाइड नोटमध्ये दोन मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे. पहिला म्हणजे २१ मे रोजी पायलने तिच्या मैत्रिणींसोबत केलेल्या जेवणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल या तिघींनी तिची खरडपट्टी काढली. जेवणाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करायला वेळ आहे, मात्र काम करण्यासाठी वेळ नाही, अशा शब्दांत या तिघींनी तिला दरडावले. तर दुसरा प्रसंग, पायल तडवी २२ मे रोजी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली असताना रुग्णांसमोर व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसमोर या तिघींनी तिचा अपमान केला.
या तिघींवर तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा व पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच अँटी रॅगिंग अॅक्ट आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (हिंसाचार प्रतिबंध) कायद्यांतर्गतही आरोप ठेवण्यात आला आहे.
क्राइम ब्रँचने दोषारोपपत्रात १५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात आरोपींनी ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या रुग्णांसमोर व कर्मचाऱ्यांसमोर पायलचा अपमान केला, त्यांचाही समावेश आहे. यामधील महत्त्वाची साक्षीदार म्हणजे पायलची मैत्रीण स्नेहल. आरोपी डॉक्टर पायलवर सतत जातीवेचक टिपणी करून तिला मानसिक त्रास देत होत्या, असे स्नेहलने पोलिसांना सांगितले आहे.
जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी
विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या तिघींच्या जामीन अर्जावर गुरुवार, २५ जुलै रोजी सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले.
आरोपींची जामिनावर सुटका करायची की नाही, हे तीन बाबींवर ठरेल. आरोपींची जामिनावर सुटका केल्यावर त्या फरार होण्याची शक्यता आहे का? आरोपी पुराव्यांची छेडछाड करू शकतात का? आणि आरोपी समाजासाठी घातक ठरू शकतात का? या तिन्ही बाबींचा गुरुवारी सुनावणीदरम्यान विचार करू, असे स्पष्ट करीत न्या. दमा नायडू यांनी जामिनावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.