श्रीवास हत्याकांडातील आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 09:39 PM2021-05-17T21:39:46+5:302021-05-17T21:40:25+5:30
बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
श्रीवास प्रकरण उघड झाल्यापासून बागडे फरार होता. तो गँगस्टर रणजीत सफेलकर टोळीतील मुख्य गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मृत मनीष श्रीवास, छोटू बागडे आणि इशाक मस्ते हे तिघे खास मित्र होते. ते सफेलकर टोळीत सक्रिय होते. धोका निर्माण झाल्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला होता. त्यानुसार बागडेने ३ मार्च २०१२ ला रात्री मनीषला 'मस्त माल आणला आहे', असे सांगून कारमध्ये बसवले. ते पवनगावच्या एका फार्महाऊसवर गेले. तेथे रणजीत सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो यांनी मनीषवर शस्त्राचे सपासप घालून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दरीत फेकले.२०१२ च्या या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी तबबल ९ वर्षांनी केला. त्यात सफेलकरसह आतापावेतो सात जणांना अटक केली. छोटू बागडे मात्र फरार होता. रविवारी पहाटे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी युनिट तीनच्या पथकाकडून त्याला पाचपावलीत नाट्यमयरित्या अटक केली. सोमवारी त्याला न्या. व. भ. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी केली. सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बागडेला २८ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.
---
आणखी गुन्हे उघड होणार ?सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांना पोलिसांनी वेगवेगळ्या तारखेला अटक केली. प्रत्येकाच्या चौकशीतून कोणता ना कोणता मोठा गंभीर गुन्हा उघड झाला. बागडेच्या पीसीआर मधूनही आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस अधिकारी वर्तवित आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बी. एन. नलावडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.