तीन दिवस शंभर सीसीटीव्ही तपासून बतावणी करणाऱ्या दोन आरोपींना पेल्हार पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:29 PM2022-10-03T17:29:49+5:302022-10-03T17:30:56+5:30
दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करून दोन दुचाकी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा - चोरीची दुचाकी वापरून बतावणी करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करून दोन दुचाकी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे.
घोडबंदर येथे राहणारे बीपीन पांचाळ (४८) यांनी शुक्रवारी दुपारी एव्हरशाईन येथील एचडीएफसी बँकेतून तीन लाखाची रक्कम काढून ते दुचाकीने वसई फाटा येथून नालासोपारा फाटा येथे जात होते. यावेळी शौचालयाजवळ पडलेले पैसे पाहून ते पैसे उचलण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली होती. यादरम्यान गाडीच्या उघड्या डिक्कीतून तीन लाखाची रोख रक्कम चोरट्यांनी काढून ते पळून गेले होते. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तीन दिवस तपास करत तब्बल शंभर सीसीटीव्ही तपासून दोन्ही आरोपींना उल्हासनगर येथून २८ सप्टेंबरला अटक केली आहे.
कुंचला चिन्नाबाबू (३८) आणि किशोर व्यंगट्ट्या (३०) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. चौकशीत दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. कुंचला चिन्नाबाबू हा सराईत असून यांच्यावर दोन राज्य व चार जिल्ह्यात २१ गुन्हे पहिले दाखल होते. यातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दोन दुचाकी आणि ८५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. हे आरोपी बँकेवर लक्ष ठेवून जास्त रोख रक्कम काढणाऱ्या नागरिकांना टार्गेट बनवून फसवणूक करत असल्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी लोकमतला सांगितले.
बतावणी करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीची दुचाकी वापरून असे गुन्हे करत असल्याने त्यांचा माग काढणे खूप कठीण होते. पण १०० सीसीटीव्ही तपासून त्याच्या माध्यमातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. - विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)