६६० बेशिस्त रिक्षाचालकांसह १६९१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 08:49 PM2019-02-28T20:49:20+5:302019-02-28T20:50:53+5:30
पारदर्शी कारवाईसाठी ई चलन; ४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल
डोंबिवली - शहारातील १६९१ बेशिस्त रिक्षा चालकांसह अन्य दुचाकी व चारचाकी वाहनांनी नियम तोडल्याकारणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फेब्रुवारी महिन्यात एकूण ४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीपासून ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे पोलीस आयुक्तालयामधून आलेल्या आदेशांनूसार एकही दंडात्मक कारवाई ही ई चलनाशिवाय होता कामा नये, त्याचे पालन करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतेज जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले की, १०३१ दुचाकी, चारचाकी चालकांकडून २ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर ६६० बेशिस्त रिक्षा चालकांकडून १ लाख ६२ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये गणवेश न घालणारे १३७, फ्रंट सीट ४५, स्टँडवर ऊभे न राहता वाहतूक कोंडीत भर घालणा-या ३१० रिक्षा चालकांचा त्यात समावेश आहे. लायसन नसणे ८०, लायसन जवळ नसणे २५, रोडवर पार्किंग ३५, नो एंट्रीतून रिक्षा चालवणे १४, बीज नसणे ०८, विद्यार्थी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ०३ वाहनचालकांवर, तसेच भाडे नाकारणा-या ०२ रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ही सर्व दंडात्मक कारवाई ई चलनद्वारे करण्यात आल्याने संबंधित वाहनचालकांचा पूर्वीचा दंड असेल तर, तसेच या आधीही काही कारवाई झालेली असेल तर तो सर्व तपशील त्यात मिळतो. जेणेकरून कारवाई करतांना कठोर निर्णय घ्यायचा की नाही यावर विचार विनिमय करणे सोपे जाते. वरिष्ठांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार ठेवण्यासही सहकार्य होत असल्याचा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
* भाडे नाकारणा-या रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांनी थेट वाहतूक नियंत्रण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन जाधव यांनी केले. मुजोरी करणे, उद्धट वर्तन करणे अशा सर्वांवर कारवाई होणारच असा पवित्रा घेत जाधव म्हणाले की, शहरातील सुमारे ३० रिक्षाचालकांचे लायसन रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव आरटीओ, कल्याण अधिका-यांकडे पाठवला असून लवकरच त्यावर निर्णय येण्याची प्रतिक्षा आहे.