फक्त १२ हजारांसाठी २ गावातील लोक एकमेकांना भिडले; ८ जण रक्तबंबाळ झाले, काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 10:39 AM2023-06-04T10:39:25+5:302023-06-04T10:39:34+5:30
याठिकाणी मोठापुरा गावात केवळ १२ हजारांच्या व्यवहारावरून लोनारा आणि मोठापुरा गावातील लोक एकमेकांच्या जीवावर उठले.
खरगोन - मध्य प्रदेशातील खरगोन इथं १२ हजारांच्या व्यवहारासाठी २ गाव एकमेकांना भिडले. गावकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एका गटाने लाठीने तर दुसऱ्या गटाने धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले चढवले. या हाणामारीत एकाच कुटुंबातील ८ जण रक्तबंबाळ झाले. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. जिल्हा मुख्यालयापासून १६ किमी अंतरावरील ऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
याठिकाणी मोठापुरा गावात केवळ १२ हजारांच्या व्यवहारावरून लोनारा आणि मोठापुरा गावातील लोक एकमेकांच्या जीवावर उठले. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात लाठ्याकाठ्या, धारदार शस्त्रे यांचा वापर करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ८ जखमी झाले. त्यात धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने ३ जण रक्तबंबाळ झाले होते. तर जखमींमध्ये महिलांचाही समावेश होता. या घटनेनंतर रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना खरगोन इथं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. या सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा हॉस्पिटलचे डॉ. कुंदन सिसोदिया म्हणाले की, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून त्यात ८ जण जखमी झाले. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. तर लोनारा गावात राहणाऱ्या भाच्याला १२ हजार रुपये उधार दिले होते. मात्र जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा ते न देता १०-१२ लोकांनी आमच्या मोठापुरा गावात येऊन लाठ्याकाठ्या आणि शस्त्रांनी हल्ला केला. हल्ला करणारे आमचेच नातेवाईक आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.